Sunday 22 March 2015

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या 2 कथा, दारु वाटपात वाढ आणि पैश्यात घट

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत मतदारांना खुश करत आपल्याकडे वळविण्यासाठी उमदेवाराने नाना युक्त्या आणि शक्कलीचा वापर केला असून वर्ष 2013 च्या निवडणूकीच्या तुलनेत वर्ष 2015 मध्ये दारु वाटपात वाढ आणि पैश्यात घट झाली आहे. मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीत दारु वाटपात 26 टक्क्यांनी वाढ आणि पैसे वाटपात 81 टक्क्यांची लक्षणीय घट झाल्याची बाब समोर येत आहे.

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिल्ली पोलीसांकडे वर्ष 2013 आणि वर्ष 2015 या विधानसभा निवडणुकीत जप्त दारु आणि रोख रक्कमेची माहिती विचारली असता दिल्ली पोलीस मुख्यालयातील उपायुक्त( मुख्यालय ) आणि जन सूचना अधिकारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 2015 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 33 लाख 38 हजार 500 रुपये अशी रोख जप्त केली आणि विविध प्रकारची जी दारु जप्त केली त्यात 1,47,613 क्वार्टर(पव्वा),  7,235 हाफ(अध्धा), 6,929 बोतल, 1,055 बीयर आणि 10 लीटर दारु आहे. वर्ष 2013 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 1 कोटी 76 लाख 88 हजार 540 रुपये अशी रोख जप्त केली आणि विविध प्रकारची जी दारु जप्त केली त्यात 1,16,044 क्वार्टर(पव्वा), 8,654 बोतल, 4,038 हाफ(अध्धा), 630 बीयर आणि 2407 लीटर दारु आहे. याबाबतीत उमेदवाराचे आणि अटक केलेल्या व्यक्तीचे नाव व केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली असता अनिल गलगली यांचा अर्ज सर्व गुन्हे विभागाच्या जन माहिती अधिका-यांकडे पाठविला गेला आहे.

मागील 2 निवडणुकीची तुलना केली असता या वर्षी दारु वाटपात 26 टक्क्यांनी वाढ आणि पैसे वाटपात 81 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दारु आणि पैसे वाटप सुरु असल्याची तक्रार प्रचार दरम्यान सार्वजनिक करत मतदारांना अश्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असतानाही पैसे कमी पण दारु वाटप करण्यांनी आपले काम चोख बजावले. जी दारु आणि पैसे जप्त केली गेली आहे ती संख्या पहाता प्रत्यक्षात किती वाटप झाले असेल? याची संख्या कल्पनेबाहेरची आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांस पत्र पाठवुन उमेदवार आणि अन्य व्यक्ती अश्या प्रकारात संलग्न आहेत अश्याची नावे फोटो सहित सरकारी आणि दिल्ली पोलिसांच्या वेबसाइट वर प्रर्दशित करण्याची मागणी केली आहे जेणेकरुन भविष्यात लोकलज्जास्तव अश्या प्रकारात कोणी संलग्न होणार नाहीत.

No comments:

Post a Comment