Tuesday 26 May 2020

सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न सोडविताना 'समान काम- समान वेतन' या संवैधानिक अधिकारानुसार रु.५४०००/- इतके विद्यावेतन देण्याची मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील (BMC Hospitals) , कॉलेज ऑफ फिजिशियनस् अँड सर्जनस् (College of Physicians and Surgeons, Mumbai) सोबत संलग्न असलेल्या पद्व्युत्तर पदविका ( Post Graduate Diploma and Degree courses) चा अभ्यास करणाऱ्या विविध विभागातील निवासी डॉक्टरांना दरमहा रु १४८००/- (अक्षरी रुपये चौदा हजार आठशे फक्त) एवढे विद्यावेतन देण्यात येते. सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न सोडविताना  'समान काम- समान वेतन' या संवैधानिक अधिकारानुसार रु.५४०००/- इतके विद्यावेतन देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की इतर वैद्यकीय महाविद्यालयातील, निवासी डॉक्टरांना ( Resident doctors ) तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी ( Medical officers ), हाऊस ऑफिसर ( House officers) या पदांवर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना, ज्यांचे किमान शिक्षण एम. बी. बी. एस् पदवीधर ( MBBS ) असते, त्यांस विद्यावेतन वा वेतन हे किमान रु ५४०००/- (अक्षरी रुपये चौपन्न हजार फक्त) इतके आहे.

विद्यावेतनात असा भेदभाव फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित रुग्णालयांतच गेली अनेक वर्षे केला जातोय. कॉलेज ऑफ फिजिशियनस् अँड सर्जनसशी संलग्न असलेल्या पद्व्युत्तर पदविकां ( CPS degree and diploma courses ) चा अभ्यास करणाऱ्या इतर वैद्यकीय महाविद्यालयातील व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा तपशील पुढील प्रमाणे- 

१) जगजीवनराम रेल्वे हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल - रु. ५३०००/-

२) मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल - रु. ५१०००/-

३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया- रु.५१०००/-

४) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर - रु.५१०००/-

५) स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड- रु.५१०००/-

६) श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ - रु.५१०००/-

७) ठाणे महानगरपालिका संचलित, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा, ठाणे - रु. ४८०००/-

८) नानावटी रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४५०००/-

९) होली फँमिली हॉस्पिटल, वांद्रे- रु. ४००००/-

बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित रुग्णालयातील एम.डी/ एम.एस्/ डी.एन्.बी ( MD/MS/DNB ) चा अभ्यास करणाऱ्या निवासी डॉक्टर ( Resident doctors ) ; तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी ( Medical officers ), हाऊस ऑफिसर (House officers ) या पदांवर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना, ज्यांचे किमान शिक्षण एम. बी. बी. एस् पदवीधर असते. विद्यावेतन वा वेतन हे किमान रु ५४०००/- (अक्षरी रुपये चौपन्न हजार फक्त)आहे.

सर्व कॉलेज ऑफ फिजिशियनस् अँड सर्जनस् शी संलग्न असलेल्या पद्व्युत्तर पदविकां ( CPS ) चा अभ्यास करणारे निवासी डॉक्टर हे इतर निवासी डॉक्टरांप्रमाणेच आणि तितकेच सक्षमपणे काम करतात व विविध विभागांमध्ये २४ तास सेवा देतात. नैसर्गिक आपत्ती असो वा कोणतीही आपात्कालीन परिस्थिती असो सदैव सेवेसाठी तत्पर असतात. मग हा आप-पर भाव कशासाठी? सध्याच्या महागाईच्या काळात रु.१४८००/- इतके विद्यावेतन स्वतःच्या आणि कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी पुरेसे नाही. तरीही 'समान काम- समान वेतन' या संवैधानिक अधिकारानुसार रु.५४०००/- इतके विद्यावेतन द्यावे व जमल्यास मागील महिन्यांची भरपाई ( Arrears ) देण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

गलगली पुढे म्हणाले की सध्या कोरोना विषाणू सारखी आपत्ती जगभर पसरलेली आहे. त्यास मुंबई सुद्धा अपवाद नाही. मुंबई तर देशाची कोरोना राजधानीच बनली आहे. अशा आपात्कालीन परिस्थितीत सी. पी. एस चे निवासी डॉक्टर, महानगरपालिकेच्या विविध रूग्णालयात कोरोना वॉर्ड, आय. सी. यू , विलगीकरण वॉर्ड मध्ये सक्षमपणे, विनातक्रार इतर निवासी डॉक्टरांप्रमाणेच अहोरात्र सेवा देत आहेत. शासनाने नुकतेच निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात रु १०,०००/- इतकी वाढ केलेली आहे, म्हणजे ते आता रु ६४,०००/- इतके झाले आहे. तसेच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रु ५०,०००/- इतके केले आहे. मात्र सी.पी.एस निवासी डॉक्टरांकडे अनावधानाने अथवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच यांचे विद्यावेतन रु १४,८००/- इतकेच आहे. एकीकडे कामाचा काहीच अनुभव नसलेल्या इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना रु ५००००/- इतके विद्यावेतन तसेच इतर निवासी डॉक्टरांना रु ६४०००/- आणि सी. पी. एस निवासी डॉक्टरांना केवळ रु १४८००/- हा महानगरपालिकेचा दुजाभाव आहे, असा आरोप गलगली यांचा आहे.

No comments:

Post a Comment