Friday, 9 October 2015

उन्नत मेट्रोच्या तुलनेत भुयारी मेट्रोचा खर्च तिप्पट

मुंबई - एमएमआरडीए प्रशासन एमएमआरडीए कार्यक्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरवित असून कोठे उन्नत तर कोठे भुयारी मेट्रोस विरोधही होत आहे. उन्नत मेट्रोच्या तुलनेत भुयारी मेट्रोचा खर्च तिप्पट असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली असून उन्नत मेट्रोचा खर्च प्रति किमी 250 ते 300 कोटी आहे तर भुयारी मेट्रोचा खर्च प्रति किमी तिप्पट असल्याचे सांगितले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मेट्रोचे कामाबाबत माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की उन्नत मेट्रो मार्गाकरिता अंदाजे प्रति किमी रु 250 ते 300 कोटी खर्च येतो तसेच भुयारी मेट्रो मार्गाचा प्रति किमी खर्च हा उन्नत मेट्रो मार्गाच्या प्रति किमी खर्चाच्या जवळपास तीनपट असतो. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गावरील पहिला टप्पा 1 दहिसर ते डी एन नगर या प्रकल्पाची किंमत रु 6390 कोटी आहे.अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या प्रकल्पाची किंमत रु 6056 कोटी तर कुलाबा-वांद्रे-सीप्झ(अंधेरी) या प्रकल्पाची किंमत रु 23,136 कोटी इतकी आहे. म्हणजे उन्नत मार्ग असता तर रु 11,860 इतकी रक्कम लागली असती जी आता भुयारी मार्गासाठी रु 35,582 इतकी आहे म्हणजे रु 23,721 कोटी रक्कम अधिक खर्च होत आहे, असे अनिल गलगली यांनी सांगितले. # सक्षम समितीने दिली मान्यता उन्नत मेट्रो जास्त खर्चिक नसतानाही भुयारी मेट्रोचे काम करण्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे निदेश असल्यास त्याची माहिती मागितली असता अनिल गलगली यांस 43 व्या सक्षम समिती ( Empower Committee) बैठकीच्या इति वृत्तांताची प्रत दिली. वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो वनच्या कार्यान्वयाच्या दरम्यान शिकलेल्या धडयानंतर पुढे उन्नत आणि भुयारी मार्गाचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर एमएमआरडीएने जमीनीवरचे वास्तव मुंबई ट्रांसफॉर्मेशन सपोर्ट यूनिट कडे सादर केले. यास संचालक बी सी खटुआ यानी दिनांक 26 एप्रिल 2013 रोजी मान्यता दिली. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांच्या मतानुसार मुंबईत अरुंद आणि गजबजलेली अवस्था रस्त्याची आहे तसेच मेट्रो वनच्या बांधकामात विलंबाचा सामना करावा लागल्यामुळे भविष्यातील मेट्रो मार्ग पूर्व उपनगरातील काही कमी वर्दळीचे स्थान वगळून भुयारी केले जावे. जरी भुयारी मार्ग खर्चिक असले तरी जमीन भूसंपादन, अतिक्रमण, वाहतूकीचा त्रास, सतत विलंब आणि किंमतीत वाढ सारख्या समस्या उद्भभवणार नसल्याचे मत मदान यांनी व्यक्त केले. # महानगर प्रदेशात 25 मेट्रो मार्ग सर्वकष परिवहन अभ्यास 2008 नुसार मुंबई महानगर प्रदेशात एकूण 25 मेट्रो मार्ग प्रस्तावित असून दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, वडाळा-घाटकोपर-तीन हाथ नाका ठाणे-कासारवडवली, वडाळा-मुख्य डाक कार्यालय GPO, सीप्झ-कांजूरमार्ग, शिवडी-प्रभादेवी हे मुंबईतील मेट्रो मार्ग आहेत. तर उर्वरित प्रदेशातील मेट्रो मार्गात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, भिवंडी-कल्याण, शिवडी-प्रभादेवी, दहिसर-मीरा रोड-माणिकपूर-विरार, ठाणे रिंग मेट्रो, ठाणे-घोडबंदर-दहिसर, बाळकुम(ठाणे)-भिवंडी-कल्याण-नार्थेन गाव, पोखरण-खारेगाव, कुशवली-अंबरनाथ, कांजूर मार्ग-महापे-कल्याण फाटा-पाईप लाईन, मानखुर्द-वाशी- नार्थेन गाव, वाशी-बेलापूर-न्यू एयरपोर्ट-पनवेल, तारघर-खारकोपर-नाव्हा शेवा-डोंगरी, खारकोपर-धुतम-पिरकोने-शिरकी-वडखल, डोंगरी-पिरकोने-जिते, शिरकी-वाशी-जिते, फोर्ट(होरिमन सर्कल)-उरण-डोंगरी, शेवरी- खारकोपर या 18 मेट्रो मार्गाचा समावेश आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रस्तावित मेट्रो मार्गाचा खर्च देण्यात येईल, असे अनिल गलगली यांस सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment