Thursday, 15 October 2015

मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे काम 32 महिने रखडले

मुंबईतील विकासकामात जशी दिरंगाई होते तश्याच दिरंगाईचा फटका मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीला बसला असून काम 32 महिने रखडल्यामुळे कंत्राटदार मेसर्स चौधरी एंड चौधरी या कंत्राटदारावर रु 16.68 लाखाचा दंड आकारला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात प्रस्तावित इमारती बाबत माहिती विचारली होती. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे जन माहिती अधिकारी आणि लेखा अधिकारी एस.एम.देवकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की प्रस्तावित इमारतीचा कार्यारंभ आदेश कंत्राटदार मेसर्स चौधरी एंड चौधरी यास दिनांक 25 ऑगस्ट 2011 रोजी देण्यात आले होते. 32 कोटी ही स्वीकृत निविदेची रक्कम असून प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिने होता. 24 फेब्रुवारी 2013 पर्यंत प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे 31 मे 2014 ही प्रकल्पास दिलेली मुदतवाढ होती. प्रकल्पाची एकुण वाढीव रक्कम 22.55 कोटी असून त्यात 13.88 कोटी स्थापत्य व इतर कामे, 5.75 कोटी अंतर्गत सजावट कामे( फर्नीचर काम), 23 लाख स्वयंपाकगृह व भोजनालयगृह, 2.69 कोटी वातानुकूलित यंत्रे( एयर कंडीशनिंग) अशी कामे आहेत. # वास्तुविशारदास दिले रु 36,48,329 इमारतीचे डिझाईन काम मेसर्स हाफिज कांट्रेक्टर या वास्तुविशारद तर्फे करण्यात आली असून त्यास शुल्कापोटी रु 36 लाख 48 हजार 329 इतकी रक्कम देण्यात आले आहे. अशी माहिती अनिल गलगली यांस देत पुढे कळविले आहे की सदर इमारत तळमजला अधिक 6 मजल्याची असून या इमारतीमध्ये 32 अधिकारी आणि 950 कर्मचारी यांची व्यवस्था होईल. # कंत्राटदारास रु 16.68 लाखाचा दंड दिनांक 1 जून 2014 पासून कंत्राटदार मेसर्स चौधरी एंड चौधरी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दिनांक 31 ऑगस्ट 2015 पर्यंत रु 16 लाख 68 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment