Wednesday, 9 September 2015

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची गुणपत्रिका देण्यास बोर्डाचा नकार

आपल्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे वादाच्या भोव-यांत सापडलेले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद श्रीधर तावडे यांची दहावी आणि बारावीची गुणपत्रिका देण्यास एसएससी आणि बारावी बोर्डाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एसएससी आणि बारावी बोर्डाकडे विनोद श्रीधर तावडे यांची दहावी आणि बारावीची गुणपत्रिका, हॉल तिकीट अशी माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सह सचिव रंजना चासकर यांनी अशी माहिती फक्त ज्याची गुणपत्रिका आहे त्यास देण्याचा नियम असल्याचे सांगितले. या आदेशाच्या विरोधात अनिल गलगली यांनी प्रथम अपील केले असता एसएससी आणि बारावी बोर्डाचे मुंबई मंडळाचे विभागीय सचिव सि.या. चांदेकर यांनी आदेश दिले की विनोद श्रीधर तावडे यांची माहिती त्रयस्थ व्यक्तीची असल्यामुळे देता येत नाही. माहितीचा अधिकार अधिनियम,2005 चे कलम 11(1) अंतर्गत माहिती देण्यासाठी व्यक्तीस लेखी नोटिस देण्यात येते.अशी माहिती देण्यासाठी त्या व्यक्तीचा बैठक क्रमांक, वर्ष आणि पत्ता नमूद करत स्वतंत्र अर्ज दाखल करावा. अनिल गलगली यांनी आपल्या अपील सुनावणीत युक्तीवाद केला होता की गुणपत्रिका नाही दिली तरी चालेल पण कमीत कमी विनोद तावडे उत्तीर्ण आहेत किंवा नाही? याबाबत लेखी माहिती दिली तरी चालेल. विभागीय सचिव चांदेकर यांनी त्यास नकार दिल्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीच आता याबाबतीत पुढाकार घेत संशयाचे वातावरण दूर करावे, अशी माफक अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment