Thursday, 14 May 2015

मोनो रेलच्या सुरक्षेवर मासिक 76 लाखांचा खर्च

भारतातील पहिली मोनो रेल जी मुंबईत कार्यरत आहे तिच्या सुरक्षेवर मासिक 76 लाखांचा खर्च येत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली असून दररोज सरासरी 14282 हजार प्रवाशी मोनो रेलचा लाभ घेत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मोनो रेलबाबत माहिती मागितली होती. मोनो रेलचे उप अभियंता आणि जन माहिती अधिकारी यांनी अनिल गलगली यांस कळविले की 2 फेब्रुवारी 2014 रोजी मोनो रेल सुरु झाली आहे. एकूण खर्च 2716 कोटी अपेक्षित असून आतापर्यंत 2290 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मेसर्स स्कोमी इंजीनियरिंग बीएचडी, मलेशिया समूह (LTSE) आणि मेसर्स लार्सन एंड टुब्रो, इंडिया या कंपन्यास 2290 कोटी रुपये अदा केले आहे. मोनो रेलच्या 7 स्टेशन आणि डेपो सुरक्षेवर 75 लाख 96 हजार 77 रुपये मासिक खर्च येत असून महाराष्ट्र स्टेट सिक्यूरिटी कॉरपोरेशन यास नियुक्त केले आहे. मोनो रेल प्रवाशी संख्या आणि तिकीट विक्रीची माहिती विचारली असता अनिल गलगली यांस कळविण्यात आले की फेब्रुवारी 2014 ते मार्च 2015 या 14 महिन्यात 59 लाख 98 हजार 069 प्रवाश्यांनी मोनो रेलचा लाभ घेतला असून तिकीट विक्रीच्या माध्यमातून 4 कोटी 88 लाख 46 हजार 969 रुपये एमएमआरडीए प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाले आहे. एमएमआरडीए प्रशासनाला प्रत्येक फेरीमागे 3131 रुपये खर्च येत असून एका दिवसात 131 पेक्षा जास्त फेरी होत नाही. दुस-या टप्याचे काम 81 टक्के पूर्ण झाले असुन उर्वरित राहिलेले काम डिसेंबर 2015 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की मोनो रेलची सेवा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा एक भाग असून मासिक सुरक्षा शुल्क शासनाने माफ करत मोफत सुरक्षा सेवा पुरवली तर मोनो रेलचे होणारे नुकसान कमी होईल. तसेच काही जास्तच प्रमाणात सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी असून जितकी आवश्यकता आहे तितकीच कार्यरत ठेवावी.

No comments:

Post a Comment