Friday, 3 April 2015

मेट्रोवर स्वर्ग आणि मेट्रो खाली नरक


वर्सोवा ते घाटकोपर या भागात धावणा-या मेट्रो खालील अस्वच्छता आणि अव्यवस्थाबाबत एमएमआरडीएने आपले हात झटकत मुंबई मेट्रो खालच्या परिसरांची दुरुस्ती आणि सुशोभिकरण कामाची जबाबदारी पालिका आणि एमएमओपीएलची असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. मेट्रो खाली फ्लावर बेड सुशोभिकरण करण्यास स्वतः एमएमओपीएलने इच्छा दाखवूनही 823 दिवसापासून काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्सोवा ते घाटकोपर या भागात धावणा-या मेट्रो खालील पसरलेली अस्वच्छता आणि अव्यवस्थाबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनास माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की वर्सोवा ते घाटकोपर या भागात धावणा-या मेट्रो खालील रस्ते, फुटपाथ, सीवरेज लाईन दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिका यांचे असून फ्लावर बेड सुशोभिकरणाचे काम एमएमओपीएल यांचे आहे. मेट्रो खाली असलेल्या पिलर मधील भागाचे सुशोभिकरण केले गेले नसून हे काम करण्याची जबाबदारी कोणाची असल्याचे अनिल गलगली यांनी विचारले असता सदर काम हे मे. मुंबई मेट्रो -1 प्रा. लिमिटेडने करायचे असल्याची माहिती दिली गेली आहे. काम न केल्याबाबत  मेट्रो कंपनी कंत्राटदारास बजावलेली नोटिस किंवा दंडात्मक कारवाईची माहिती मागितली असता एमएमआरडीएने  दिनांक 17 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमिटेड या कंपनीने सुशोभिकरण करण्यासाठी मागितलेली परवानगीची प्रत  दिली. एमएमआरडीएतील परिवहन आणि दळणवळण विभागाचे प्रमुख पी आर के मूर्ति यांनी 1 जानेवारी 2013 रोजी 15 अटीच्या शर्तीवर परवानगी दिली. पण मेट्रो वन कंपनीने 29 महीने काहीच काम केले नाही यामुळे पी आर के मूर्ति यांनी दिनांक 3 मार्च 2015 रोजी कंपनीचे योजना हेड आणि व्होलटाइम संचालक भारत बी मोदगिल यांस पत्र पाठवून त्यांस दिलेल्या परवानगीची आठवण करुन देत ताबडतोब सुशोभिकरण काम करण्याची सूचना केली.


अश्याप्रकारे एमएमआरडीए प्रशासनला उल्लू बनवत मेट्रो कंपनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला. मेट्रोवर स्वर्ग आणि मेट्रो खाली नरक अशी अवस्था करणा-या मेट्रो कंपनीवर एमएमआरडीएने कारवाई करावी आणि पालिकेस त्यांची कामे करण्याची सुचना देत सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत,अशी मागणी अनिल गलगली यांनी सरते शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस कडे केली आहे.

No comments:

Post a Comment