Wednesday 22 April 2015

निविदा न काढता एमएमआरडीएने जारी केले 18.90 कोटीचे ध्वनिरोधक काम 

राज्य सरकार या क्षणी पारदर्शकतेला अग्रक्रम देत असताना जनतेचा पैसा वाया घालवत निविदा न काढता एमएमआरडीएने 18.90 कोटीचे ध्वनिरोधकचे काम जारी केले असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जे कुमार नावाच्या कंत्राटदारास मुख्यमंत्र्याचे अभय असल्याने तक्रार करुनही कारवाई करण्याचे धाडस एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान दाखवित नाही आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे विविध   ध्वनिरोधक कामाची माहिती मागितली होती. यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने सरकारी नियम आणि निविदा प्रक्रियेला डावलत अतिरिक्त कामाच्या नावावर रस्ते कंत्राटदार जे कुमार यास सरळ 18.90 कोटीचे काम दिले.ज्यास सेंट्रल रोड रिसर्च एजेंसी (सीआरआरआय) ने काम देण्याची शिफारस केली होती.उड्डाणपुलाच्या कामाच्या 2 वर्षांनंतर एमएमआरडीएने सेंट्रल रोड रिसर्च एजेंसी (सीआरआरआय)ला ध्वनि मोजणी आणि   करण्याचे काम दिले. यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुल मार्ग ( 8.68कोटी ), जेवीएलआर येथील आयआयटी कैंपस ( 4.11कोटी ), पूर्व ईस्टर्न फ्री वे येथील आणिक-पांजरापोल लिंक रोड ( 76.50 लाख ) आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक मार्ग (5.14 कोटी ) याकामी एमएमआरडीएने निविदा काढल्या होत्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन हॉस्पिटल, किंग्स सर्कल-तुलपुले चौक आणि हिंदमाता उड्डाणपुल या विविध उड्डाणपुलासाठी ध्वनिरोधकाचे काम देताना निविदा न काढता एमएमआरडीए प्रशासनाने जे कुमार या कंत्राटदारावर मेहरनजर दाखवित 18.90 कोटीचे काम बहाल केल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. यापूर्वी सुद्धा जे कुमार यास दहिसर रेल्वे ओलांडणी पुलावर रुपये 5.74 कोटीचे काम निविदा न काढताच अतिरिक्त कामाच्या नावावर जारी करण्याचे काम एमएमआरडीएने दिले होते.

बाजारात हेच काम कमीत कमी रुपये 9500 प्रति वर्ग मीटरने होत असताना एमएमआरडीए प्रशासनाने रुपये 12500  प्रति वर्ग मीटरचा महाग पर्याय निवडला गेला ज्यामुळे एमएमआरडीएस 4 ते 5 कोटीचा फटका बसला आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि एमएमआरडीए महानगर आयुक्त यूपीएस मदान यांस लेखी पत्र पाठवून ताबडतोब योग्य ती कारवाईची मागणी करत निविदा काढत सनदशीर मार्गाने काम जारी करण्याबाबत जोर दिला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारी नंतर सुद्धा एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान कारवाई करण्याचे धाडस दाखवित नाही कारण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे कुमार कंपनीचे मालक असलेले पिता पुत्र जगदीश गुप्ता आणि कमल गुप्ता यांच्याबरोबर असलेले सख्य कारणीभूत मानले जात असल्याची चर्चा एमएमआरडीए मुख्यालयात आहे.

No comments:

Post a Comment