राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त झालेल्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि मुंबई संघटक व सोशल मीडीया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे यांची नावांची शिफारस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 1 महिन्यांपूर्वी केली असली तरी आजही राज्यपालांनी निर्णय न घेतल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्यपाल सचिवालयाने दिली आहे. राज्यपालातर्फे विधानपरिषदेवर साहित्य, विज्ञान,कला,सहकारी चळवळी आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जाते. राज्यपालांनी निर्णय घेतला नसल्याने राजकीय लोकांच्या वर्णीवर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे माहिती विचारली होती की राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे यांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात यावी. राज्यपाल सचिवालयाचे जनमाहिती अधिकारी आणि अवर सचिव( प्रशासन) यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री महोदयांकडून प्राप्त शिफारस पत्रावरील निर्णय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्याची प्रत उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. सचिवालयास नामनिर्देशनाद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्तीबाबत नियम, अटी व शर्तीबाबत माहिती विचारली असता स्पष्ट करण्यात आले की भारतीय संविधानाच्या कलम 171(5) मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यपाल महोदयांमार्फत विधानपरिषदेवर साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळी आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जाते. सदर नियुक्ती शासनाकडून प्राप्त शिफारशीच्या आधारे केली जाते. या व्यतिरिक्त नामनिर्देशनाद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्तीबाबत अन्य नियम, अटी व शर्तीबाबत माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही.
अनिल गलगली यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस पत्र पाठवून आवाहन केले आहे की राज्यपाल नियुक्त विधानपरिषद जागेवर राजकीय लोकांची नियुक्ती करु नये.याऐवजी साहित्य,विज्ञान,कला,सहकारी चळवळी आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड करावी.
No comments:
Post a Comment