Saturday, 1 August 2015
पंकजा मुंडे दांडी मारण्यात अव्वल
महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्र्यानी मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थिती राहिले नसून वादग्रस्त ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे दांडी मारण्यात अव्वल असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्य सचिव कार्यालयाने दिली आहे. 5 टॉप दांडी बहादुर मंत्र्यामध्ये पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, डॉ दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी नि.भा. खेडेकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 11 डिसेंबर 2014 पासून जून 2015 या कालावधीत एकूण 28 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या आहेत. यापूर्वी 8 बैठका झाल्या होत्या त्यावेळी पूर्ण मंत्रिमंडळाची स्थापना झाली नव्हती.
मुख्यमंत्री आणि अन्य 17 मंत्र्यापैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा अपवाद वगळता 16 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत वादग्रस्त ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटवित 28 पैकी 9 वेळा अनुपस्थित होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत 6, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार 5, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले 5, गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता 4 , पर्यावरण मंत्री रामदास कदम 4 , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे 3, महसूल मंत्री एकनाथ खडसे 3 , ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 3 यांची क्रमवारी आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुपस्थित राहणा-या मंत्र्याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याबाबत माहिती विचारली असता त्याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचा दावा मुख्य सचिव कार्यालयाने केला आहे तर किती बैठकीत सलग उपस्थित नसल्यास पद रद्द होते, याबाबतीत कोणताही नियम नसल्याची माहिती अनिल गलगली यांस दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा विकास आणि धोरणाबाबत महत्वाची चर्चा होत असून अश्या बैठकीत मंत्र्यानी सर्व कामे सोडून उपस्थित राहण्याची अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment