Tuesday 7 July 2020

टॅब दुरुस्ती आणि अभ्यासक्रम पुरवठा 22 कोटीत शक्य! 62 कोटीत नवीन टॅब आणि अभ्यासक्रम खरेदीसाठी पालिकेचा बाळहट्ट!

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील टॅब दुरुस्ती आणि आगामी 2 वर्षाकरिता अभ्यासक्रम पुरवठा करणेबाबत जारी केलेली निविदा ऐवजी 40 कोटींहून अधिक खर्चाची निविदा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस पाठविलेल्या पत्रात टॅब प्रकरणाची चौकशी करत कमी खर्चाच्या निविदेची पूर्ण झालेली प्रक्रिया अंतर्गत काम सुरु करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि शिक्षणाधिकारी महेश पालकर यांस लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील टॅब दुरुस्ती आणि आगामी 2 वर्षाकरिता अभ्यासक्रम पुरवठा करणेबाबत जारी केलेली निविदाची वेळ वारंवार वाढविली गेल्यानंतर कमी बोलीवर निविदा काढण्यात आली पण दुर्दैवाने आजमितीला त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक टॅब मागे निश्चित केलेली रक्कम रु 5200/- इतकी होती आणि निविदा प्रक्रियेत टॅबची कमी बोलीवर रु 4974/- इतकी देण्याचे निविदेत मान्य करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत रु 22 कोटी खर्च येणार असून यात टॅबची दुरुस्ती आणि जवळपास 1300 नवीन टॅब मिळणार आहेत. परंतु दुर्दैवाने हा कमी खर्च आणि उत्तम शैक्षणिक अभ्यासक्रमात पालिकेला स्वारस्य नाही म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका 43843 इतकं नवीन टॅब खरेदीसाठी प्रयत्नशील आहे. यात टॅब किंमत आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यावर रु 62 कोटी खर्च अपेक्षित आहे. असा आरोप करत गलगली पुढे म्हणाले की यामुळे 40 कोटींचे सरळसरळ नुकसान दृष्टिक्षेपात आहे. इतक्या रक्कमेवर व्याज लक्षात घेता अजून रु 10 कोटीचे नुकसान होईल. 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेले टॅब रद्दबातल करण्याचा प्रयत्न म्हणजे आधीच गुंतवणूक केलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय करण्याजोगे आहे. असे असते तर मग निविदा का जारी करण्यात आल्या आणि आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकचा म्हणजे 40 कोटींचा केला जाणारा खर्च कोण्याच्या पथ्यावर पडेल, ही बाब स्वतंत्र चौकशीची आहे, असं गलगली यांचे म्हणणे आहे.

आता नवीन टॅब खरेदीसाठी प्रस्ताव आणला तर शैक्षणिक वर्षात उपयोग होणार नाही उलट जुन्या टॅबची दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केल्यास पैसेही वाचतील आणि अभ्यासक्रमात खंड पडणार नाही,अशी पुष्टी गलगली यांनी जोडली आहे.

No comments:

Post a Comment