मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर बेड मिळणे अशक्य झाले होते. अश्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड19 अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तब्बल 53 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. प्रत्येक बेड मागे 2,50,000 रुपये खर्च झाला असून 2118 बेड तयार करण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड 19 अंतर्गत बांधलेल्या चरण 1 आणि चरण 2 मधील रुग्णालयाची विविध माहिती विचारली होती. अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीच्या अनुसार एकूण 53 कोटी खर्च करण्यात आला आहे. चरण 1 मध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर 14 कोटी 21 लाख 53 हजार 825 रुपये इतका खर्च झाला आहे तर द्वितीय चरणात 21 कोटी 55 लाख 25 हजार 353 रुपये खर्च झाला आहे. दोन्ही चरणात बेड संख्या ही 1059 असे एकूण 2118 अशी आहे. प्रथम चरणात उपकरण आणि साहित्यावर 5 कोटी 26 लाख 47 हजार 406 रुपये खर्च करण्यात आले असून द्वितीय चरणात 12 कोटी 6 लाख 33 हजार 259 रुपये खर्च करण्यात आले आहे. या सुविधांत ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.
कोविड 19 अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते भलेही निविदा काढल्या नसल्या तरी एमएमआरडीए प्रशासनाने सर्व खर्चाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणालाही याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल.
No comments:
Post a Comment