देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असूनही सरकार आणि देणगीदारांनी मुंबई मनपाला उघड मदत केली नाही. कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेला गेल्या 4 महिन्यांत अवघ्या 86 कोटींची मदत मिळाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली मिळाली आहे. या फंडाचा सर्वाधिक वाटा मुंबई शहर जिल्हाधिकारीचा असून एकूण जमा रक्कमेपैकी 84 टक्के रक्कम आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कोविड 19 अन्वये मुंबई महानगरपालिकेला मिळालेल्या निधीची माहिती मागविली होती. मुंबई पालिकेच्या वित्त विभागाच्या मुख्य कार्यालयाने अनिल गलगली यांना मिळालेल्या विविध प्रकारच्या निधीची माहिती दिली.
गेल्या 4 महिन्यांत मुंबई पालिकेला कोविड 19 साठी एकूण 86 कोटी 5 लाख 30 हजार 303 रुपये मिळाले आहेत. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिका-यांनी 72.45 कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी 84 टक्के आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी 11.45 कोटी जमा केले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ 50 लाख रुपये दिले आहेत. खासगी लोकांनी 35.32 लाख रूपयांची मदत केली असून आमदारांकडून केवळ 1.29 कोटी निधीमध्ये जमा झाले आहेत. यामध्ये केवळ 7 आमदारांचा समावेश आहे.
अनिल गलगली म्हणाले की, कोविड 19 अन्वये आजमितीला मुंबई पालिकेने 700 कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. ना केंद्र सरकारने मुंबई पालिकेला सहाय्य केले ना मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून कोणतीही मदत प्राप्त झाली नाही. मुंबई मनपाच्या तिजोरीत कोविड 19 साठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणतीही पुढाकार घेतलेला नसल्याची बाब गलगली यांनी नमूद केली.
No comments:
Post a Comment