Friday 14 June 2019

उद्धव ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नेमणूक कशी करु शकतात?

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महापौर निवास येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून एमएमआरडीए प्रशासनाने जरी 100 कोटींची तरतूद केली असली तरी एमएमआरडीएला अंधारात ठेवत बाळासाहेब ठाकरे स्मारकाने वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापनाची नियुक्ती केली आहे, ही बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात उघड झाली आहे. 100 कोटींच्या प्रकल्पासाठी जागतिक स्पर्धा भरवित एकापेक्षा एक असे सरस वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन निवडण्याची संधी शासनाने गमावली आहे. उद्धव ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नेमणूक कशी करु शकतात?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक बाबत विविध माहिती मागितली होती. यात वास्तुविशारद आणि सल्लागार नेमण्यासाठी दिले गेलेली निविदा किंवा जाहिरात याची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासामार्फत आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याने त्याबाबतीत एमएमआरडीएकडे माहिती उपलब्ध नाही. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष यांनी एमएमआरडीए प्रशासनाचे महानगर आयुक्त यांस 1 मार्च 2019 रोजी लिहिलेल्या पत्रात कळविले आहे की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा सविस्तर आराखडा तयार करणे, अंदाजपत्रक बनविणे, निविदा प्रक्रिया तयार करुन सदर स्मारक पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक यांनी केली आहे. प्रकल्प सल्लागाराने करावयाच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याची निवड सूची करण्यात आली. सदर सूचीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीने आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णय प्रमाणे सर्व पारदर्शक प्रक्रिया पूर्ण करुन केली आली आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे स्मारक संस्थेने मेसर्स आभा नारायण लांबा अँड असोसिएटस यांच्याशी करारनामा सुद्धा केला आहे. स्मारकाने एमएमआरडीए प्राधिकरणास मेसर्स आभा नारायण लांबा अँड असोसिएटस यांना त्यांचे व्यावसायिक शुल्क देण्याची विनंती केली आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी दिनांक 4 डिसेंबर 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध संदर्भात शिफारस करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समिती गठन करण्यात आली आहे. स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे,  सदस्य सचिव सुभाष देसाई, सदस्य पूनम महाजन, सदस्य आदित्य ठाकरे, सदस्य शशिकांत प्रभू, मुख्य सचिव, नगरविकास सचिव, विधि व न्याय विभाग प्रधान सचिव आणि मनपा आयुक्त हे पदसिद्ध सदस्य आहेत.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की स्मारकासाठी कोणताही विरोध नसून वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापनाची नियुक्ती जागतिक स्पर्धा भरवित न केल्याचे दुःख आहे. एमएमआरडीए प्राधिकरण हे यासाठी सक्षम असताना स्मारकाने अशी नियुक्ती करणे योग्य नाही. 

No comments:

Post a Comment