Monday 24 June 2019

आरटीआयनंतर मुंबई इंडियन्सच्या विजयी रॅलीचे पोलीस सरंक्षण शुल्क 3.55 लाख झाले वसूल

आयपीएल सीजन 12 मधील विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने मुंबईत अंटालिया ते ट्रायडेंट हॉटेल पर्यंत विजयी रॅली काढली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआयनंतर मुंबई पोलिसांनी रीतसर अंबानी समूहाच्या इंडिअविन स्पोर्ट्स कंपनीला पोलीस सरंक्षणाचे देयक पाठविले आणि रु 3.55 लाख वसूल केले. या बाबीचा खुलासा मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 16 मे 2019 रोजी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांस माहिती विचारली होती की मुंबई इंडियन्स संघाने अंटालिया ते ट्रायडेंट हॉटेल पर्यंत काढलेल्या विजयी जल्लोषात तैनात पोलीस सुरक्षेसाठी आकारलेल्या शुल्क आणि प्रलंबित शुल्काची रक्कम किती आहे. मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस दलाने अनिल गलगली यांस कळविले की एका पाळीत 2 पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस निरीक्षक आणि 100 पोलीस शिपाई असे पोलीस सरंक्षण पुरविण्यात आले होते. अनिल गलगली यांच्या अर्ज 16 मे 2019 रोजीचा होता. यासाठी बिनतारी संदेश एपी कंट्रोल, नायगाव यांनी पाठविला आणि सशस्त्र पोलीस दलाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी दिनांक 31 मे 2019 रोजी अंबानी समूहाच्या इंडिअविन स्पोर्ट्स कंपनीच्या धोबी तलावाच्या पत्त्यावर देयक पाठविले होते. पोलीस संरक्षणाची देय रक्कम  3 लाख 55 हजार 623 ग्रॉस प्रणालीद्वारे भरण्याची विनंती कंपनीला केली असता कंपनीने 4 जून 2019 रोजी पोलीस संरक्षणाची देय रक्कम अदा केली गेली. 

अनिल गलगली यांच्या मते अश्या प्रकारे कोणतीही रॅली काढण्याची या परिसरात परवानगी नसून हा शांतता झोन आहे. आरटीआय अर्ज करत माहिती मागितली नसती तर कदाचित मुंबई पोलिसांनी पोलीस संरक्षण शुल्क घेण्याचे सौजन्य दाखविले नसते. अजून पर्यंत मुंबई पोलिसांनी अश्या रॅलीसाठी दिलेल्या परवानगीची माहिती दिली नसून परवानगी घेतली होती की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे, असे गलगली यांनी सरतेशेवटी नमूद केले आहे

No comments:

Post a Comment