Monday 31 December 2018

अकॅसिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार प्रशिक्षण शिबिरात करत प्रतिपादन केले की ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अकॅसिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच अकॅसिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार दिला आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

घाटकोपर प्रगती मंच या घाटकोपर मधील नागरिकांच्या व्हाट्सअप ग्रूपतर्फे माहिती अधिकार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील क्रांती क्रीडा मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. घाटकोपरमधील विविध सामाजिक विषयांवर भाष्य करून,जनआंदोलन करणे, अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम घाटकोपर प्रगती मंच या व्हाट्सअप ग्रुपतर्फे घेण्यात येतात. माहिती अधिकार कायदा बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच या कायदाचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा या उद्देशाने हा अनिल गलगली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मोलाचे मार्गदर्शन करत खंत व्यक्त केली की 125 कोटींच्या देशात फक्त 10 लाख भारतीय हे वर्षाला माहिती अधिकार कायदाचा वापर करत आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि मुंबई पालिका यामध्ये आपण माहिती अधिकार कायदाचा वापर कुठे आणि कश्यासाठी करावा याचे सविस्तर मार्गदर्शन गलगली यांनी केले.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांस कवडीमोल दराने दिला जाणाऱ्या भूखंड वितरण बाबत माहिती कश्या पद्धतीने बाहेर आणली याची माहिती अनिल गलगली यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1983 चा शासकीय निर्णय रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला हा माहिती अधिकार कायदाचा विजय असल्याचे सांगितले. रिलायन्स वीज कंपनीने जनतेचा लुटलेल्या पैश्यांची माहिती अधिकार कायदामुळे समोर आली आणि 2640 कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले.अशी कैक उदाहरणे गलगली यांनी दिली.

मुंबई मधील रखडलेल्या झोपु योजनांबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न या वेळी नागरिकांकडून आले तसेच लोकप्रतिनिधींचा कामांचा आढावा, शौचालय प्रश्न इत्यादींबाबत माहिती अधिकार कसे वापरावे याची देखील उत्तम मार्गदर्शन अनिल गलगली यांनी केले. माहिती अधिकार कायदासोबत दफ्तर दिरंगाई कायदा या बाबत अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात ग्रुपचे सदस्य आणि पालिका एल प्रभाग समिती सदस्य किरण लांडगे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या उपक्रमाचे तसेच ग्रुप च्या विविध कार्याचे कौतुक केले. प्रस्तावना प्रशांत बढे मांडत ग्रुपची सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रुपचे सदस्य दिगंम्बर गुरव यांनी अनिल गलगली यांचा तर अजित तांबे यांनी किरण लांडगे यांचा सत्कार केला. उपस्थितांचे आभार विक्रम कसबे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता वरपे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या व्हाट्स अपग्रूप च्या सर्वच सदस्यांनी मोठी मेहनत केली.


No comments:

Post a Comment