मुंबई उपनगरातील वीज ग्राहक हा अदानी वीज कंपनीच्या वाढीव बिलाला वैतागला असून साकीनाक्यातील जनतेने अदानीच्या वाढीव बिलाविरोधात रस्त्यांवर उतरुन निषेध केला. अदानीच्या साकीनाका येथील वीज केंद्रावर धडक मोर्चाही काढला गेला. अदानी वीज कंपनीने आपले सर्व व्यवहार पारदर्शक करत एकूण खर्च आणि एकूण नफा याचा ताळेबंद संकेतस्थळावर अपलोड करावा,अशी मागणी करण्यात आली.
साकीनाका विभागातील जनतेने विजेच्या वाढीव बिलाविरोधात रस्त्यांवर उतरत आंदोलन केले. राष्ट्रीय एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अब्बास मिर्जा यांनी आयोजित केलेल्या आंदोलनात जनतेने अदानी वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. जरीमरी येथून निघालेला मोर्चा साकीनाका येथील अदानी वीज कंपनीच्या कार्यालय येथे समाप्त झाला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की जरी शासनाने अदानी वीज कंपनीच्या विरोधात चौकशी सुरु केली असली तरी ज्या पद्धतीने लूटमार सुरु आहे ती कदापि सहन केली जाणार नाही आणि जनतेचा कष्टाचा पैसा चुकीच्या पद्धतीने कोणी लुटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याविरोधात जनता आंदोलन करणारच. अनिल गलगली यांनी अदानी कंपनीचे मालक गौतम अदानी यांस आवाहन केले की अदानी वीज कंपनीने आपले सर्व व्यवहार पारदर्शक करत एकूण खर्च आणि एकूण नफा याचा ताळेबंद संकेतस्थळावर अपलोड केल्यास सर्वसामान्य जनतेला वस्तुस्थिती आणि सत्यपरिस्थिती ज्ञात होईल. प्रत्येकाला स्वतंत्र वीज मीटर आणि प्रत्येक महिन्याला अचूक रीडिंग करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अब्बास मिर्जा, विकास शेळके, दिनेश मधुकुंटा, प्रशांत बारामती, अवधूत वाघ, सिकंदर शेख, बाबू नाईक, मनी नाडर, फ़ारुख खान, प्रदीप सिंह, अनिल गोळे, सीमा खांडेकर, वंदना माने, शकीला बानू शेख, गुडिया पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. अदानी कंपनीच्या अधिकारी संपदा जैन यांस विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले ज्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
No comments:
Post a Comment