Friday, 28 September 2018

मेरीटाईम बोर्डाने 5 महिन्यात वर्सोवा, वसई आणि मांडवातील गाळ उपसणीवर 22 कोटी खर्च केले

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तर्फे वर्सोवा, वसई आणि मांडवातील गाळ उपसणीवर गेल्या 5 महिन्यात 22 कोटी खाजगी यंत्रणेवर खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे स्वतंत्र ड्रेजर व्यवस्था असताना खाजगी यंत्रणेवर कोट्यावधी रुपये खर्च केले गेले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे गेल्या 3 वर्षात केलेल्या गाळ उपासणीची माहिती मागितली होती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सागरी अभियंता यांनी अनिल गलगली यांस कळविले की महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ड्रेजर तर्फे वर्ष 2016- 17 मध्ये गोराई जेट्टी येथून एप्रिल 2016 ते मे 2017 या कालावधीत 27,300 घन मीटर गाळ काढण्यात आला. बोरीवली जेट्टी येथून जानेवारी 2017 ते मार्च 2017 या कालावधीत 23,750 घन मीटर आणि देवबाग (कल्याण ) येथून ऑक्टोबर 2016 ते मे 2017 या कालावधीत 36,581 घन मीटर गाळ काढण्यात आला. वर्ष 2017-2018 च्या एप्रिल ते मे 2017 या कालावधीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ड्रेजर तर्फे बोरीवली जेट्टी येथून 17,250 घन मीटर गाळ काढण्यात आला. 

त्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने खाजगी यंत्रणेची मदत घेत 5 महिन्यात 22 कोटी 14 लाख 43 हजार 470 रुपये खर्च केले. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मेसर्स समुद्रा ड्रेजिंग प्रा.लि या कंपनीला नोव्हेंबर 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत वसई येथील 45,988 घन मीटर गाळ काढण्यासाठी 1 कोटी 66 लाख 93 हजार 644 रुपये अदा केले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मेसर्स समुद्रा ड्रेजिंग प्रा.लि या कंपनीला डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत वर्सोवा येथील 1,28,586 घन मीटर गाळ काढण्यासाठी 3 कोटी 93 लाख 47 हजार 316 रुपये अदा केले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मेसर्स रॉक अँण्ड रिफ ड्रेजिंग प्रा.लि या कंपनीला जानेवारी 2018 ते मार्च 2018 या कालावधीत मांडवा येथील 1,72,557 घन मीटर गाळ काढण्यासाठी 6 कोटी 72 लाख 97 हजार 230 रुपये अदा केले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मेसर्स रॉक अँण्ड रिफ ड्रेजिंग प्रा.लि या कंपनीला एप्रिल 2018 ते मे 2018 या कालावधीत मांडवा येथील 2,51,552 घन मीटर गाळ काढण्यासाठी 9 कोटी 81 लाख 05 हजार 280 रुपये अदा केले आहे. 

अनिल गलगली यांच्या मते महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे स्वतंत्र ड्रेजर यंत्रणा असताना खाजगी यंत्रणेची मदत घेतली गेली असून याबाबत काढलेला गाळ आणि तो गाळ ज्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला त्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सार्वजनिक करणे आवश्यक आहे आणि तसे आदेश देण्याची विनंती गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात करत भविष्यात बोर्डाच्या ड्रेजर मार्फत गाळ उपासणी करण्यावर जोर दिला आहे.

No comments:

Post a Comment