Tuesday 17 December 2019

2020 अखेरीस पूर्ण होईल पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या विद्याविहार रेल्वे पुलाचे बांधकाम

बहुप्रतिक्षित असा विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या रेल्वे पुलाचे बांधकाम जोरात असून 2020 वर्ष अखेरीस बांधकाम पूर्ण होईल,अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. अनिल गलगली हे गेल्या 10 वर्षांपासून विद्याविहार रेल्वे पुलांच्या जलद कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे विद्याविहार रेल्वे पुलाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका पूल विभागाने अनिल गलगली यांस कळविले की सद्यस्थितीत नाला रुंदीकरण आणि पुलाच्या पायाचे काम सुरु आहे. या कामाचे कार्यादेश दिनांक 19 एप्रिल 2018 रोजी देण्यात आले होते आणि काम पूर्ण होण्याचे दिनांक 1 नोव्हेंबर 2020 असे आहे. विद्याविहार रेल्वे पुलाची लांबी 480 मीटर आहे. रुंदी 17.5 ते 24.5 अशी आहे. प्रकल्पाची एकूण किंमत 88 कोटी 42 लाख 49 हजार 110 रुपये इतकी आहे. मध्य रेल्वेच्या मंडळ अभियंता पी के गुप्ता यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास कळविले आहे की आयआयटी मुंबईतर्फे तपासलेले डिजाईन आणि ड्राईंग असलेले नकाशे जमा करावेत. तसेच इलेक्ट्रिकलचे अनुक्रमे 1 कोटी 3 लाख 76 हजार 124 रुपये आणि 9 कोटी 98 लाख 96 हजार 992 रुपये असे एकूण 11 कोटी 2 लाख 73 हजार 116 रुपये अदा करावेत. या व्यतिरिक्त सिग्नल आणि टेलिकॉमसाठी अनुक्रमे 44 लाख 7 हजार 390 रुपये व 84 पैसे आणि 32 लाख 58 हजार 744 रुपये व 96 पैसे असे एकूण 76 लाख 66 हजार 135 रुपये व 80 पैसे इंफ्रिग्नमेंट शुल्क अदा करण्यासाठी सांगितले आहे.

अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त प्रविनसिंह परदेशी यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की मध्य रेल्वेच्या शुल्काची रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात यावी जेणेकरून पैश्यांअभावी कामात अडथळा निर्माण होऊ नये.

No comments:

Post a Comment