रूग्णमित्र संचालित रूग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्थेतर्फे दादर येथील देवाडीगा हाॅलमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की आरोग्याच्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन वैद्यकीय आस्थापना कायदा लागू केल्यास आरोग्य सेवेची ही विषमता दूर होऊन एक उत्तम आरोग्य सेवा मिळेल. दुर्दैवाने सरकारी पातळीवर सकारात्मक भूमिका घेतली जात नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की आरोग्याच्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन वैद्यकीय आस्थापना कायदा लागू केल्यास आरोग्य सेवेची ही विषमता दूर होऊन एक उत्तम आरोग्य सेवा मिळेल. याकरीता एक लोकचळवळीतून सरकारवर दबाव आणण्यासाठी आरोग्य विषयक काम करणा-या विविध एनजीओ, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन मेडिकल माफीया विरूध्द लढा उभारण्याची गरज आहे व भविष्यात रूग्णमित्रांतर्फे हे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र, राज्य सरकार, महापालिका यांच्या देण्यात येणा-या आरोग्य सेवेसाठी माहितीच्या अधिकारातून माहिती मागवून जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन गलगली यांनी यावेळी केले.
रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना, प्रधानमंत्री जीवनदायी योजना, धर्मादाय रूग्णालय, महापालिका रूग्णालय, शासकीय रूग्णालय, राज्य कामगार विमा रूग्णालय येथील कार्यरत वैद्यकीय समाजसेवक, आरोग्य मित्र, आरोग्य सेवक व लहान मोठ्या शस्त्रक्रिया याला लागणारी मदत व आवश्यक कागदपत्रे याची माहिती दिली व वैद्यकीय मार्गदर्शनपर तक्ता बनवून सोप्या पध्दतीने रुग्णमित्र कार्य कसे करू शकतात हे विशद केले. भविष्यात आरोग्यविषयक स्टडी टूर करण्याचा रूग्णमित्रांतर्फे मानस असल्याचे सांगितले.
जयराम नाईक यांनी रक्त संकलन, रक्तपेढ्या थॅलेसेमिया, सिकलेस रूग्ण यांना रक्तदानातून रूग्णमित्र म्हणून त्यांची टीम कशी कार्य करते याची माहिती दिली. थॅलेसेमिया रुग्णाचे पालक राजकुमार राठोड यांनी शहरी भाग सोडून खेडेगावात थलेसिमीया रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचाराविना कसे त्रस्त होऊन मरणयातना सहन करीत आहे त्यावर भाष्य केले.
संयोजक जितेंद्र तांडेल यांनी डायलिसिस उपचार व किडनी विकाराचे रूग्ण वाढत असल्याची भीती व्यक्त केली तसेच महापालिका, शासकीय रूग्णालय यांच्या कडील डायलिसिस, व्हेंटीलेटरची, वैद्यकीय अर्थसंकल्पावरील माहिती मागवून दिलेल्या माहितीच्या आधारावर यंत्रणा कशी उदासीन आहे याचा पाढाच वाचला. लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रूग्णालयाचे माजी वैद्यकीय संचालक डाॅ.संजय कुमार ठाकुर यांनी आरोग्य व्यवस्थेसाठी मंत्री, सचिव, आयुक्त, वैद्यकीय संचालक एवढी सक्षम यंत्रणा असताना वैद्यकीय सेवा कशी दुर्लक्षित आहे याबद्दल नाराजी व्यक्त केली.भविष्यात रूग्णमित्रांतर्फे आपले नगरसेवक, आमदार, खासदार यांना महिन्यातून एकदा भेटून ती सक्षम करण्याचा कृती आराखडा तयार करण्याचा व या सेवेकडे मुख्य न्यायाधीश व न्याय व्यवस्थेचे लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
श्रेया निमोणकर (मेडिकल व्हीक्टीम) यांनी स्वतःला चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे होणारा त्रास व न्याय मिळण्याऐवजी मनस्ताप होत असल्याची खंत व्यक्त केली. स्वाती पाटील यांनी २०० खाटांची रूग्णालये खाजगी करण्याच्या सरकारी धोरणाबद्दल आझाद मैदानात आंदोलन उभे केले व सुदृढ़ आरोग्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. वझे काॅलेजचे विद्यार्थीदशेत सत्यकाम एनजीओचे प्रमुख मिहीर जाधव यांनी त्यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती दिली. परेश मोरे यांनी दिप अर्चन कसे कार्य करते समाजासाठी आमची नेहमीच बांधिलकी राहिल असे सांगितले. अजित वहाडणे यांनी ब्लडी फास्ट ह्या अपव्दारे आरोग्याच्या विविध सेवांचा फायदा एका क्लीकवर कसा घेता येईल हे सांगितले. एड विल्सन गायकवाड़ यांनी आरोग्यात कायद्याची बाजू हे सांगितले.
रूग्णमित्रांच्या कार्याची प्रसिद्धी व विविध आरोग्य विषयक येणा-या बातम्या सोशल मिडीयाव्दारे फेसबुक, व्हाटसअपवर आस्थेने व जागरुकपणे मांडणारे रुग्णमित्र व आमची वसईचे कार्यकर्ते राजेंद्र ढगे यांनी सविस्तर माहिती दिली. ओकार सेवा संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भास्कर कसा घडलो रूग्णमित्र याचे अनुभव कथन केले. कुटुंब फाउंडेशनचे सचिन जगदाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आधार बहुउद्देशीय संस्थेचे किरण विश्वनाथ यांनी दुष्काळग्रस्त गावात संस्थेने केलेल्या कामाची माहिती दिली. १०० वेळा रक्तदान केलेले रक्तदाते गणेश आमडोसकर व ८५ वेळा रक्तदान केलेले रक्तदाते प्रशांत म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.
जय साटेलकरला व संदीप तवसाळकर यांच्या सोबतीने अमोल सावंत, सचिन जोईल, हर्षद मंचेकर, प्रशांत बेलूसे, परशुराम लाड, श्रध्दा आष्टीवकर (प्रसन्न फाउंडेशन) यांनी उत्तम व्यवस्थापन पाहिले. प्रेस्टीज ग्राफिक्सचे मालक विद्याधर तवसाळकर यांच्या संकल्पनेतून सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. एकनाथ सांगळे, हेमंत राऊत, मिनाक्षी वेलणकर, हेमंत लोणकर (फार्मासीस्ट असोसिएशन) यांच्यासारख्या विविध शासकीय यंत्रणेव्दारे लढा देणा-या व्यक्तींची विशेष उपस्थिती लाभली. रूग्णमित्र संकल्पना चळवळीचे आवाहन आभार प्रदर्शनात विनोद साडविलकर यांनी केले.
No comments:
Post a Comment