Thursday 2 May 2019

माहिती अधिकाराच्या वापराबरोबरच लोकप्रतिनिधींशी संवाद साधणे आवश्यक- प्रवीण महाजन

आपल्या भागात आपला नगरसेवक करत असलेल्या कामाबाबत नागरिकांनी प्रश्न तर विचारलेच पाहिजेत, पण हे प्रश्न विचारताना संबंधित नगरसेवकाशी थेट संवादही साधला पाहिजे असे मत प्रवीण महाजन यांनी व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्राच्या सोशल सर्व्हिस लीग सभागृह, परळ येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अधिकाधिक लोकांना मराठी भाषेच्या संवर्धन आणि सजग वापरासाठी जागृत करणे तसेच समाजामध्यामतील मराठीचा वापर वाढवणे यासाठी प्रबोधनपर सत्रांचे आयोजन मराठी अभ्यास केंद्राकडून महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मराठी अभ्यास केंद्र आणि मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘माहिती अधिकाराद्वारे नगरसेवकाचे मूल्यमापन’ प्रकल्पातून सिद्ध झालेल्या  'माझा प्रभाग - माझा नगरसेवक' ही १९ अहवालांची अहवालमालिका प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये मुंबई विद्यापीठातील १६ विद्यार्थ्यांचे अहवाल, मयुर मोरये - दीपक कापले ह्या कार्यकर्त्यांचा संयुक्तपणे केलेला अहवाल, ह्या प्रकल्पाचे समन्वयक आनंद भंडारे यांचा अहवाल आणि ह्या सर्व अहवालांचा संकलित अहवाल असे एकूण १९ अहवाल प्रकाशित करण्यात आले. यावेळी समर्थनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के व मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख संजय रानडे उपस्थित होते.

प्रजा फाउंडेशनचे मिलिंद म्हस्के यांनी नगरसेवकांचे असे मूल्यमापन मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांद्वारे होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नगरसेवकांच्या अशा प्रकारच्या पारदर्शी मूल्यमापनामागे असलेले  माहिती अधिकाराचे पाठबळ अधोरिखित केले. संजय रानडे यांनी चांगले पत्रकार घडण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांचे महत्त्व विशद केले.  संकेत वरक या विद्यार्थ्याने माहिती अधिकाराद्वारे नगरसेवकांची माहिती मिळवताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी मांडल्या. याप्रसंगी मराठी अभ्यास केंद्राच्या‘नागरिकायन’ या आर्थिक – राजकीय गटाची स्थापना करण्यात आली. नागरिकांचे राजकीय – आर्थिक  अधिकार आणि कर्तव्ये यांबाबत सजगता निर्माण करण्यासाटी सदर गटाची स्थापना करण्यात आली असून त्याअंतर्गत अधिकाधिक नागरिकांनी या गटात सहभागी व्हावे असे आवाहन या गटाचे प्रमुख आनंद भंडारे यांनी केले. मराठी अभ्यस केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भाषेचे कार्य विशुद्ध साहित्यापुरते मर्यादित ठेवल्याने मराठी भाषेची आजवर हानी होत आलेली आहे. लोकांच्या मातृभाषेतून राज्यकारभार  हाकल्यानेच पारदर्शी लोकशाही अमलात येऊ शकेल असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि.ग. वझे महाविद्यालयातील 'वीथी’ रंगकर्मींनी 'मराठी शाळा’नावाची छोटीशी पण मार्मिक नाटिका सादर केली. यामध्ये मराठी शाळांची सद्यःस्थिती मांडताना चिऊताई चिऊताई दार उघड, शेपटीवाल्या प्राण्यांची सभा या गाण्यांचा तसेच ससा - कासवाच्य गोष्टीचा रूपक म्हणून वापर करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कोरा (Quora) मराठीचे समुदाय व्यवस्थापक प्रशांत ननावरे यांनी कोरा मराठीच्या व्यासपीठावर जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण मराठी भाषेत कशी केली जाते तसेच Quora मराठीअंतर्गत आपले योगदान आपण कसे वाढवू शकतो याविषयीचे सादरीकरण केले.

तिसऱ्या सत्रात ‘उच्चशिक्षणात मराठीमधून विज्ञान – तंत्रज्ञान’या विषयावर बोलताना संगणकतज्ज्ञ डॉ. अभिजात विचारे यांनी मराठीतील तांत्रिक शब्द आणि त्याच अर्थाचे इंग्रजी शब्द यातील फरक समजावून सांगितला. उच्चशिक्षणातील मराठीच्या पिछेहाटला आपणच जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  सर ज. जी. कला महाविद्यालयातील डॉ. संतोष क्षीरसागर यांनी भाषेचा वापर ही सुद्धा एक कलाच आहे असे म्हणत नवीन पिढीकडून मी आशावादी आहे असे मत यावेळी मांडले.

चौथ्या सत्रात पत्रकार अलक धुपकर, भाषांतरकार आणि ब्लॉगर मेघना भुस्कुटे आणि बहुविध.कॉमचे संस्थापक किरण भिडे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रंसगी मराठी अभ्यास केंद्राच्या संकेतस्थळाचे आणि‘मराठी प्रथम’ ह्या ऑनलाईन नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. भाषेचा वापर सहज आणि सोपा असेल तरच तो सर्वसामान्य माणसांना कळू शकतो. यादृष्टीने ज्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा राजकीय नेत्यांच्या भाषांचा अभ्यास करण्याची गरच असल्याचे मत अलका धुपकर यांनी मांडले. ‘मराठी प्रथम’ हे भाषेसाठी वाहिलेले पहिलेच ऑनलाईन नियतकालिक असून त्याने अभिजनांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व प्रकारच्या भाषेचा वापर केला पाहिजे असे प्रतिपादन मेघना भुस्कुटे यांनी केले. किरण भिडे यांनी विविध नियतकालिंकाचे व्यासपीठ असलेले  बहुविध.कॉमच्या कार्याची माहिती सांगितली. मराठी प्रथमचे संपादक प्रकाश परब यांनी आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या भाषिक घडामोडी आणि वापर, प्रयोगशील मराठी शाळा, वाङ्‍मय मंडळे यांबाबत शिक्षक आणि भाषाप्रेमींना या नियतकालिकासाठीmarathipratham.com या मेलवर लेख पाठवण्याचे आणिbahuvidh.com/marathipratham ह्या दुव्यावर जाऊन मराठी प्रथमचे सभासद होण्यासाठी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या धनावडे आणि प्रतीक्षा रणदिवे यांनी केले

No comments:

Post a Comment