Friday, 22 February 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषदेची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे नाही

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेली पत्रकार परिषद तसेच प्रत्यक्षात दिलेल्या थेट मुलाखतीची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अभिलेखावर नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे 8 डिसेंबर 2018 रोजी ऑनलाइन अर्ज करत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती विचारली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात बोलाविलेल्या पत्रकार परिषद, स्थान, दिनांक आणि पत्रकार परिषदेचा विषय याची माहिती देण्यात यावी. तसेच प्रसार माध्यमांच्या किती प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट मुलाखत किंवा रेकॉर्डिंग केली आहे अश्या मुलाखतीचा दिनांक, स्थान, विषय, प्रसारमाध्यमच्या प्रतिनिधींचे नाव आणि प्रसारमाध्यमाचे नाव याची माहिती मागितली होती. पंतप्रधान कार्यालयातील अवर सचिव प्रवीण कुमार यांनी दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी अनिल गलगली यांस कळविले की हे प्रकरण त्यांच्या कार्यालयाच्या प्रक्रियेचे अधीन आहे आणि उत्तर लवकरच पाठविले जाईल. पंतप्रधान कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर तसेच माहिती न मिळाल्यामुळे अनिल गलगली यांनी 68 दिवसानंतर म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी प्रथम अपील केले. प्रथम अपील करताच पंतप्रधान कार्यालयातील अवर सचिव प्रवीण कुमार यांनी प्रक्रियाधीन असलेेेल्या गलगली यांच्या अर्जाला उत्तर देत कळविले की पंतप्रधान यांचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी होणारा संवाद हा दोन्ही संरचित आणि असंरचित आहे. म्हणूनच विचारलेली माहिती ही अभिलेखावर उपलब्ध नाही.

अनिल गलगली यांच्या मते ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ताबडतोब उत्तराची अपेक्षा होती पण पंतप्रधान कार्यालयाने वेळखाऊ धोरणांचा अवलंब केला आणि माहिती देण्यास जाणूनबुजून दिरंगाई केली. प्रथम अपील दाखल केल्यानंतर जी माहिती दिली गेली आहे ती दिशाभूल आणि अर्धवट आहे. पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट करावे की पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे किंवा नाही? असे आवाहन पंतप्रधान कार्यालयास करत गलगली म्हणाले की अश्याप्रकारे माहिती नाकारत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान कार्यालयाने उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस वादग्रस्त बनविले आहे.


No comments:

Post a Comment