वांद्रे -कुर्ला संकुल ( जी- ब्लॉक) ते पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्या दरम्यान उन्नत मार्ग व व्ही एन पुरव मार्गावरील चुनाभट्टी येथील रेल्वे क्रॉसिंगच्या जागी रेल्वे उड्डाणपूलाचे काम विविध कारणांमुळे रखडले असून मुख्य पुलाचे काम पूर्ण करुन वाहतुकीस नोव्हेंबर 2019 रोजी खुला करणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. या उन्नत मार्गामुळे वाहनचालकांना कुर्ला आणि सायन येथून वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही आणि येथील वाहतुकीची कोंडीही सुटेल.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे वांद्रे -कुर्ला संकुल ( जी- ब्लॉक) ते पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्या दरम्यान उन्नत मार्ग व व्ही एन पुरव मार्गावरील चुनाभट्टी येथील रेल्वे क्रॉसिंगच्या जागी रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाचे कार्यकारी अभियंता अ. रा. भिसीकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की 16 ऑगस्ट 2014 रोजी 155 कोटी 70 लाखांची प्रशासकीय मान्यता होती. आजतागायत 136 कोटी रुपये खर्च झाला असून मेसर्स जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड काम करत आहे. 21 एप्रिल 2015 कार्यारंभ आदेश असून 31 ऑक्टोबर 2018 रोजी काम पूर्ण झाले पाहिजे होते. 31 ऑक्टोबर 2019 ही कामास दिलेली मुदतवाढ असून नोव्हेंबर 2019 महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात येईल.
एमएमआरडीए प्रशासनाने कामातील विलंबाचा पाढाच वाचला आहे. यात सार्वजनिक बांधकाम व वाहतुक पोलीस यांच्या सूचनेनुसार सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूस पर्जन्यवाहिन्या बांधणे तसेच मुख्य रस्ता हा सेवा रस्त्यांशी एकत्र करत वाहतुकीस खुला करण्यासाठी लागलेला कालावधी नमूद केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गलगतच्या सोमैया मैदान येथील रस्त्यासाठी आरक्षित विकास आराखडयातील जमीन ताब्यात मिळवण्यासाठी बराच कालावधी लागला.प्रेमनगर येथील प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण व पुर्नवसन करुन तेथील जमीन ताब्यात मिळणे तसेच टाटा कंपनीच्या 110 केव्हएच्या एचटी लाईन आणि दोन टॉवरचे स्थलांतर व पूर्णबांधणी करण्यासाठी बराच कालावधी लागला. मध्य आणि हार्बर रेल्वे येथील आरओबी व एफओबी बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून बराच कालावधी लागला. चुनाभट्टी स्थानकाजवळ लेवल क्रॉसिंग येथे रस्ता रुंद करण्यासाठी जमीन अधिग्रहण करत प्रकल्पग्रस्ताचे पुर्नवसन व स्थलांतर झाल्यानंतर रेल्वे ओलांडणी पुलाचे काम हाती घेण्यात येईल.
अनिल गलगली यांच्या मते हा उन्नत मार्ग आणि रेल्वे ओलांडणी पुलामुळे कुर्ला एससीएलआर, सीएसटी रोड,सायन रेल्वे स्थानक आणि जेव्हीएलआर येथील वाहतुकीची कोंडी संपेल आणि सरळ मार्गाने बीकेसी ते पूर्व द्रुतगती मार्गाकडे वाहनचालक प्रशस्त होतील.
No comments:
Post a Comment