Tuesday 22 March 2022

125 मंडळांनी एकत्र येऊन कुर्ल्यात साजरी झाली तिथीनुसार शिवजयंती

'झाले कुर्लेकर एकत्र एकच शिवजयंती सर्वत्र' अशी घोषणा करून कुर्लेकरांनी सन 2019 सालापासून शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी करण्याचे ठरवले. कुर्ल्यातील 125 सार्वजनिक मंडळे , संस्था, राजकीय पक्ष एकत्र आले आणि एकत्रित मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. सन 2019, सन 2020 अशा दोन वर्षी भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु सन 2021 साली कोरोनाच्या संकटामुळे भव्य मिरवणूक होऊ शकली नाही. परंतु यंदाच्या वर्षी कुर्लेकरांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. यंदाचा जल्लोष काही वेगळाच होता. ढोल ताशे, पारंपरिक हलगी वादन, श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या मुलींचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिके, छत्रपती शिवराय व मावळयांच्या वेशात कलाकार यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. या मिरवणुकीतील शिवरायांच्या पालखीचे प्रत्येक मंडळ स्थानी जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत एकूण 5000 नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

या मिरवणुकीत श्री सर्वेश्वर मंदिरात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवरायांचा पाळणा सादर केला. पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांनी छत्रपती शिवरायांना हार घालून स्वागत केले., याप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे उमेश गायकवाड, गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, अजय बाळू यादव, किरण सुर्वे, किशोर सोनावणे, अजय शुक्ला, किरण दामले तसेच सर्व राजकीय पक्षांचे आणि मंडळांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या भव्यदिव्य मिरवणुकीने कुर्लेकरांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment