Wednesday 21 March 2018

पालिकेच्या चतुर्थ श्रेणीची पदे 1388 उत्तीर्ण परीक्षार्थीची संख्या 1,06,193  

मुंबई महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत 1388 पदासाठी मेसर्स महाऑनलाईन कंपनीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल 44 टक्के जाहीर करत यात 1,06,193 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. एकूण रु 15.13 कोटी इतके शुल्क जमा झाले असून बायोमेट्रिक पद्धतीचा प्रथमच वापर करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेने राबविला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे चतुर्थ श्रेणीत 1388 पदासाठी घेतलेल्या परीक्षे बाबत माहिती विचारली होती. पालिकेच्या कामगार विभागाने अनिल गलगली यांस कळविले की कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, आया, स्मशान कामगाराच्या 1388 पदासाठी 2,87,088 अर्जदार होते. दिनांक 15 फेब्रुवारी  ते 25 फेब्रुवारी 2018  असे सलग 10  दिवशी आयोजित परीक्षेत 2,40,495 अर्जदार प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवारास त्यांची प्रश्नपत्रिका ( उत्तरासहित) व त्याने निवडलेल्या योग्य पर्यायासहित त्या उमेदवारांच्या वैयक्तिक ईमेल द्वारे दिनांक 28 फेब्रुवारी 2018 रोजी पाठविण्यात आली. सदर ऑनलाईन परिक्षेचा अभ्यासक्रम उप आयुक्त ( सामान्य प्रशासन) आणि अतिरिक्त आयुक्त ( शहर) यांच्या मंजूरीने मेसर्स महाऑनलाईन या संस्थेस देण्यात आला. अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मेसर्स महाऑनलाईन यांनी केलेले आहे.

महाराष्ट्र शासनाचा भागीदार असलेला उपक्रम मेसर्स महाऑनलाईन लिमिटेड कंपनीला प्रति उमेदवार 521.56 असे शुल्क निश्चित केलेले होते. आतापर्यंत रु 14,97, 80,864/-  इतके शुल्क अदा केले असून रु 15,87,136/- इतकी रक्कम देणे शिल्लक आहे. या परीक्षा बायोमेट्रिक पध्दतीने घेतल्या असून निवडयादी तयार केल्यानंतर निवड केलेल्या उमेदवाराची निवड सुद्धा बायोमेट्रिक पध्दतीने करण्यात येणार आहे. परीक्षा अर्ज स्वीकारण्यापासून निवड होईपर्यंत सर्व प्रक्रिया आणि जबाबदारी मेसर्स महाऑनलाईन कंपनीची आहे. तसेच भविष्यात पत्र, तक्रारी, माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरण इत्यादी बाबतीत मनपास मेसर्स महाऑनलाईन कंपनी सहकार्य करणार आहे.

अनिल गलगली यांच्या मते लाखों अर्जदारांच्या परीक्षा घेताना मेसर्स महाऑनलाईन कंपनीने घेतलेली दक्षता आणि पालिकेने कोणताही गोंधळ किंवा पेपर फुटी न होता बजावलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. वेळेत निकाल जाहीर करत परस्पर अर्जदारास ईमेल वर उत्तरपत्रिका पाठविण्यात आली असून आता मुंबई विद्यापीठाने खाजगी कंपनीवर अतिविश्वास न ठेवता शासकीय कंपनीला निवडावे, असे मत गलगली यांनी सरतेशेवटी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment