Tuesday 6 June 2017

पेनीसुला हॉटेल परिसरातील पालिका मंडईत भाजी विकण्याऐवजी लग्न समारंभाचा सपाटा

जमीन विकसित करताना असलेल्या आरक्षणाचा विकास करत साकीनाका येथे बांधलेल्या पालिका मंडईत गेल्या 7 वर्षांपासून एकदाही भाजी विकली गेली नाही ना पालिकेने निश्चित केलेला किरकोळ धंधा . उलट पेनीसुला हॉटेलच्या मालकाने पालिकेची फसवणूक करत मंडईची इमारत चक्क लग्न समारंभ आणि अन्य जंगी पार्टीसाठी देण्याचा सपाटाच लावला. नुकतेच पालिकेने आक्रमक भूमिका घेत नोटीस बजावली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या बाजार विभागास साकीनाका येथील पेनीसुला हॉटेल परिसरातील तळमजला आणि 1 माळयाच्या पालिका मंडईची माहिती विचारली होती. बाजार विभागाचे सहायक अभियंता नि. म. लुमण यांनी अनिल गलगली यांस कळविले की  पालिकेने 5 मे 2017 रोजी मेसर्स पेनीसुला नेक्स्टचे मालक करुणाकर राजू शेट्टी यांस नोटीस बजावली आहे. दिनांक 13 एप्रिल 2017 रोजी पालिकेने प्रत्यक्ष पाहणी केली असता या इमारतीत कोणताही मंडईचा क्रियाकलाप सुरू नव्हता. मंडईच्या इमारतीच्या बांधकामात अतिरिक्त बदल करण्यात आले आहे. तसेच मंजूर आराखडयातील तळमजला रिकामा करत त्यास शिल्लक असलेल्या भागाशी जोडला आहे. विशेष म्हणजे या मंडईत कोणताही किरकोळ आणि भाजीचा धंधा सुरुच केला नाही. मंडई इमारतीसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार शेट्टीने बंद केला असल्याची बाब नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत मनीषा म्हैसकर पाटणकर  या अतिरिक्त पालिका आयुक्त असताना एप्रिल 2010 मध्ये पेनीसुला नेक्स्टचे मालक करुणाकर राजू शेट्टी आणि पालिकेत लीज करार करण्यात आला होता. 2 कोटीचा प्रीमियमवर शेट्टी यांनी मंडई सुरु करण्याच्या शर्तीवर मंडईची इमारत घेतली असून आज 7 वर्षानंतरही एकदाही ती मंडई सुरु करण्यात आली नाही. स्थायी समितीचे तत्कालीन 2 सदस्य राजहंस सिंह आणि समीर देसाई यांच्या उपस्थितीत आणि पालिका उपायुक्त राजेंद्र भोसले, सहायक आयुक्त दीपक कामत यांच्या संमतीने अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी शेट्टीशी लीज केली. 

पेनीसुला हॉटेल हे नेहमी वादग्रस्त राहिले असून मंडई सुरु करण्याऐवजी शेट्टीने लग्न समारंभ, दारुच्या जंगी पार्टीसाठी या इमारतीचा सर्रास वापर केला आहे. अनिल गलगली यांनी मंडई इमारत पालिकेने ताब्यात घेत तेथे मंडई सुरु करण्याची मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे. जेणेकरुन ज्या उद्देश्याने मंडई बांधण्यात आली आहे त्याचा लाभ स्थानिक रहिवाश्यांस होईल. तसेच पालिकेची फसवणूक करत कोटयावधीची रक्कम कमविणा-या करुणाकर शेट्टीकडून पैसे वसूल करत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गलगली यांनी सरतेशेवटी केली आहे.

No comments:

Post a Comment