Friday 27 January 2017

अपात्र नगरसेवकांनी मुंबई पालिकेचे थकविले १२ लाख

गेल्या दोन महापालिका निवडणुकांमध्ये राखीव वॉर्डातून निवडून आलेल्या व जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरलेल्या तसेच अन्य अशा एकूण ५ नगरसेवकांनी विविध भत्त्यांपोटी मिळालेले ११ लाख ९८ हजार 166 रु. थकवल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महानगरपालिका चिटणीस खात्याने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महानगरपालिका चिटणीस खात्याकडे नगरसेवक रद्द झालेल्या माजी नगरसेवकांकडून वसूल केलेल्या थकबाकीची माहिती विचारली होती. महानगरपालिका उप चिटणीस शोभना येरंडेकर यांनी अनिल गलगली यांस माहिती उपलब्ध करुन दिली. २००७ ते २०१७ पर्यंत विविध राजकीय पक्षांच्या १६ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यांना नगरसेवक म्हणून मिळालेले मानधन व भत्ते परत करण्याचे पत्र पालिकेच्या चिटणीस खात्याने पाठवले होते. या १६ जणांपैकी लालजी यादव, अंजुमा फातिमा, अनुषा कोडम, जोबनपुत्रा भावना 

आणि इसाक शेख शेख युसूफ मोहम्मद या ५  जणांनी बारा लाख रकमेची थकबाकी भरलेली नाही. लालजी यादव यांनी रु 7,439 , अंजुम फातिमा यांनी रु 45,388, अनुषा कोडम यांनी रु 3,20,681, जोबनपुत्रा भावना यांनी 3,65,428 तर इसाक शेख यांनी रु 4,59,230 आजपर्यंत अदा केली नाही.

अनिल गलगली यांनी थकबाकी ठेवलेल्या या माजी नगरसेवकांवर पालिकेची मालमत्ता बुडविल्याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पालिका चिटणीस यांनी जातीने लक्ष घालत वसूली करणे आवश्यक असताना फक्त जिल्हाधिकारी यांस पत्रव्यवहार करत आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप करत अनिल गलगली यांनी थकबाकीदार माजी नगरसेवकांची नावे फोटो सहित पालिका संकेतस्थळावर तसेच संबंधित प्रभाग कार्यालयात दर्शनीभागी झळकविण्याची मागणी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.हा जनतेचा पैसा असून चुकीच्या मार्गाने अपात्र नगरसेवकांनी मिळविला असल्यामुळे त्यांनी तो परत करणे आवश्यक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment