Monday, 27 October 2025

थॅलेसेमिया जनजागृती कार्यशाळा 3.0

थॅलेसेमिया जनजागृती कार्यशाळा 3.0

“वाद नको, संवाद पाहिजे" समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे”

थॅलेसेमिया या गंभीर आनुवंशिक आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायन येथील लो. टी. म. स. रुग्णालय (लोकमान्य टिळक स्मृती रुग्णालय) येथे “थॅलेसेमिया जनजागृती कार्यशाळा 3.0” हा सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

ही कार्यशाळा “वाद नको, संवाद पाहिजे" समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे” या संदेशासह आयोजित करण्यात आली होती. रुग्ण, त्यांचे पालक, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन या आजारावर जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यशाळेत तज्ज्ञ डॉक्टरांनी थॅलेसेमिया म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, निदान, उपचार पद्धती तसेच विवाहपूर्व रक्त तपासणीचे महत्त्व या विषयांवर सखोल माहिती दिली.

तज्ज्ञांनी सांगितले की थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार असून, त्यात शरीरात हिमोग्लोबिन निर्माण होण्याची प्रक्रिया बिघडते. या आजारावर औषधोपचारांपेक्षा जागरूकता आणि वेळेवर तपासणी हेच प्रभावी प्रतिबंधक उपाय आहेत. विवाहपूर्व ‘थॅलेसेमिया कॅरिअर टेस्ट’ प्रत्येक तरुण-तरुणीने करून घेणे गरजेचे आहे, असा संदेश देण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात रुग्णमित्र मार्गदर्शक अनिल गलगली, विनोद साडविलकर आणि संपूर्ण रुग्णमित्र संलग्न सामाजिक संस्था परिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन, समन्वय आणि कार्यवाहीत मनःपूर्वक सहभाग घेतला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कार्यशाळेचे आयोजन केवळ यशस्वीच नव्हे, तर मानवतेच्या सेवेला समर्पित उपक्रमाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. या उपक्रमात सहयोगी संस्था मुंबई यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला. त्यांचे सहकार्य, संसाधन आणि संघटन कौशल्य या कार्यक्रमाच्या यशात मोलाचे ठरले.

समाज सेवा विभागाच्या वतीने विभाग प्रमुख व मुख्य समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश गायकवाड यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की “थॅलेसेमिया रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी समाज सेवा विभाग सदैव तत्पर राहील. आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमातून निर्माण झालेला संवाद भविष्यात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरेल.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे डॉ. मोहन जोशी (अधिष्ठाता, लो. टी. म. स. रुग्णालय), डॉ. राधा गढीयाल, डॉ. सुजाता शर्मा, डॉ. पूर्वी कुट्टी, डॉ. पूर्वा राणे-सुर्वे, विनय शेट्टी, विद्याधर गांगुर्डे, गजानन नार्वेकर, गणेश पवार, धनंजय पवार, रमेश चव्हाण, प्रफुल्ल नवार, निरंजन आहेर, जय साटेलकर, अमोल सावंत, श्रध्दा अष्टीवकर, रोटरी क्लब ऑफ भांडूप मुंबई, सीमा क्षीरसागर, तरुण युवक मंडळ भारतीबेन संगोई, प्रशांत म्हात्रे, गणेश आमडोसकर, बाबू बतेली, रत्नाकर शेट्टी, रियाज मुल्ला, सुभाष गायकवाड यांचे विशेष आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांनी ठरवले की आगामी काळात थॅलेसेमियाबाबत अधिक जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालये आणि समाज संस्थांमध्ये संवाद सत्रे आयोजित करण्यात येतील.

कार्यक्रमाची सांगता या प्रेरणादायी ओळींनी करण्यात आली .

“थॅलेसेमियावर जनजागृतीचा दीप लावू,
सेवेच्या वाटेवर एकत्र चालू।
रुग्णमित्रांनी दाखवली मानवतेची वाट,
प्रेम, समर्पण, आणि आरोग्य यांचा संवाद॥”


No comments:

Post a Comment