Monday, 8 January 2018

कृषि मंत्री आणि राज्यमंत्र्यांवर महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने केली गाड्याची खैरात

शासकीय परिवहन सेवेतील मंत्री वाहन ताफा रद्द करुन वाहन ताफ्यातील मंत्री महोदयांना त्यांच्या कामकाजाकरिता प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करुन दिले जाते पण राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अतिरिक्त 2 तर राज्यमंत्री सदा खोत यांनी अतिरिक्त 1 वाहन वापरत असून त्यांस ड्रायव्हरची सोय केल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांनी दिली आहे. माजी कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोबत मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि कृषि खात्याचे प्रधान सचिव यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांसकडे कृषि मंत्री आणि कृषि राज्यमंत्री यांच्यासमेत ज्यांस गाड्या पुरविल्या आहेत त्याची माहिती मागितली होती. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित तर्फे अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या माहितीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांस 2 गाड्या समेत 3 ड्रायव्हर दिले असून तिन्ही ड्रायव्हर कंत्राट पद्दतीवर आहेत. कृषि राज्यमंत्री सदा खोत यांना 1 गाडी दिली असून दोन्ही ड्रायव्हर कंत्राट पद्धतीवर आहेत. कृषि खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषि मंत्र्यांचे खाजगी सचिव धुरजड यांस प्रत्येकी 1 गाडी दिली असून ड्रायव्हर महामंडळाचा स्थायी कर्मचारी आहेत. माजी कृषि मंत्री आणि सद्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी स्वतःची असून ड्रायव्हर मात्र महामंडळाचा स्थायी कर्मचारी आहेत. फुंडकर यांस दिलेल्या 2 गाडीवर इंधन, सर्व्हिस आणि दुरुस्ती खर्चावर 7 महिन्यात रु 25,25,809/- इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे  खोतासाठी नवीन कोरी गाडी विकत घेत महामंडळाने गाडीची किंमत, इंधन , दुरुस्ती खर्चावर रु 26,50,278/-इतकी रक्कम 7 महिन्यात खर्च केली आहे. प्रधान सचिव बिजयकुमार यांस दिलेल्या गाडीचे इंधन आणि सर्व्हिस शुल्कावर रु  66,035/- इतकी रक्कम खर्च केली आहे. कृषि मंत्र्यांचे खाजगी सचिव धुरजड यांस दिलेल्या गाडीच्या इंधनावर रु 47,534/- इतकी रक्कम खर्च केली आहे.

अनिल गलगली यांस कृषि खात्याचे अवर सचिव उ म मदन यांनी कळविले की कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषि राज्यमंत्री असलेले सदा खोत या दोघांस प्रत्येकी रु 19,99,999 इतक्या रक्कमेची गाडी पुरविण्यात आली आहे. मंत्री आणि राज्यमंत्री यांस अनुज्ञेय असलेल्या गाड्यांच्या संख्येबाबत अनिल गलगली यांस सामान्य प्रशासनाने कळविले की 26 डिसेंबर 2005 च्या शासन निर्णय अन्वये शासकीय परिवहन सेवेतील मंत्री वाहन ताफा रद्द करुन या वाहन ताफ्यातील मंत्री महोदयांना त्यांच्या कामकाजाकरिता प्रत्येकी एक प्रमाणे वाहन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासन निर्णय स्पष्ट असून कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषि राज्यमंत्री सदा खोत एकापेक्षा अधिक वाहन वापरत आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत अनिल गलगली यांनी वाहनांवर झालेला खर्च तसेच ड्रायव्हरला दिलेला पगार याचा संपूर्ण खर्च यांसकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर खाजगी सचिव आणि प्रधान सचिव यांनी पदाचा केलेला दुरुप्रयोग लक्षात घेता त्यांची चौकशी करत त्यांच्याकडूनही झालेला सर्व खर्च वसूल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ तोट्यात असतानाही ज्या अधिका-यांनी शासनास अंधारात ठेवत परस्पर घेतलेल्या निर्णयाची चौकशी करत अश्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसकडे केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अश्या प्रकारे जे मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, सचिव, उपसचिव समेत खाजगी सचिव,ओएसडी आणि चेले चपाटे शासकीय गाड्यांच्या गैरवापर करत आहेत तो गैरवापर तत्काळ थांबवित कारवाईची अपेक्षा गलगली यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment