Wednesday, 25 October 2017

रिलायन्स वीज कंपनीच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

उद्योगपति अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एनर्जी लिमिटेडतर्फे वर्षानुवर्षे कंत्राट कामगारांची पिळवणुक करणे आणि अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय कामगार उत्कर्ष संघातर्फे बुधवारी सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स एनर्जीच्या मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी असंख्य कामगारांनी भाग घेत कंपनीचा निषेध केला.

सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स एनर्जीच्या मुख्यालयासमोर मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संघाचे अध्यक्ष एड राजेश दाभोळकर यांनी कंपनीत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर प्रकाश टाकत आऊटसोर्सिंग बंद करणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, मृतक कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी देणे आणि 25 टक्के बोनस देण्याची मागणी केली. 

प्रमुख मार्गदर्शक आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिलायन्स  एनर्जी आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर हा घोळ म्हणजे रिलायन्स कंपनीचा फर्जीवाडा असल्याचा आरोप केला. जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन असे 3 खाते न उघडता एकाच खात्यावर रिलायन्स काम करत आहे. कंपनी विकण्याचा डाव हा कामगार आणि लाखों ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अहितकारक आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांस आवाहन केले की वेळीच नियंत्रण नाही केले तर रिलायन्स कंपनी विकून टाकतील. 

यावेळी आनंदराव कलिगोटा, संदीप सिंह, विनायक त्रिकाळ, नितीन भालेराव, राजू मांडवकर, कुणाल संगोई, प्रवीण पवार, अतुल पवार, विकी शिर्के, शैलेश पाटील, विवेका दाभोळकर, प्रसाद अभ्यंकर, प्रकाश गावडे, रमेश सुखा, सहदेव परब आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment