Tuesday 18 July 2017

पश्चिम रेल्वेने आणीबाणीच्या आरोग्य सेवेवर एका वर्षात खर्च केले 2.22 कोटी

मुंबई उपनगरी सेवेअंतर्गत वारंवार होणारे अपघात आणि सुवर्ण तासात न मिळणारी वैद्यकीय सेवा यामुळे होरपळून निघालेल्या पश्चिम रेल्वेने मागील एका वर्षात आणीबाणीच्या आरोग्य सेवेवर तब्बल 2.22 कोटी खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वेने दिली आहे. याउलट मध्य रेल्वेने 1 रुपये क्लिनिक सुरु करुन पैश्यांची बचत केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे आणीबाणी आरोग्य कक्षाबाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे आरोग्य अधिकारी डॉ जी.के.सिंह यांनी अनिल गलगली यांस कळविले की फेब्रुवारी 2016 पासून जानेवारी 2017 या कालावधीत पश्चिम रेल्वेने 2 कोटी 21 लाख 71 हजार 145 रुपये खर्च केले असून कंत्राटदार प्रिंसीपल सिक्युरिटीज अँड एलाईड सर्विसेस हा आहे. 2 वर्षाचे कंत्राट असून लायसन्स शुल्क शून्य आहे. पश्चिम रेल्वेने 4,60,140/- रुपये अनामत रक्कम आणि बीपीजी रुपये 30,08,358/- घेतली आहे. पश्चिम रेल्वेच्या 10 ठिकाणी फेब्रुवारी 2016 मध्ये या आणीबाणी आरोग्य कक्ष सुरु झाले असून यामध्ये चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई रोड, विरार आणि पालघर येथे हे कक्ष सुरु आहेत.

अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांस सूचना केली आहे की मध्य रेल्वेच्या धर्तीवर पश्चिम रेल्वेने 1 रुपीज क्लिनिक सुरु केले तर पश्चिम रेल्वेच्या कोट्यावधी रुपयांची बचत होईल.

No comments:

Post a Comment