Monday 29 August 2016

बेस्टचा प्रति प्रवासी खर्च 21.41 रुपये आणि उत्पन्न फक्त 12.88 रुपये


मुंबईतील बेस्टची सेवा प्रवासी संख्या सातत्याने घटल्याचा परिणाम उत्पन्नात झाला आहे. वर्ष 2015-2016 या वर्षात 905.3 कोटीचा घाटा सहन करणा-या बेस्टचा प्रति प्रवासी खर्च 21.41रुपये 
उत्पन्न फक्त 12.88 रुपये असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे बेस्ट प्रवासी संख्या, उत्पन्न आणि बस प्रवर्तनकरिता होणा-या खर्चाची माहिती मागितली होती. बेस्ट प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 2015-2016 या वर्षामध्ये बेस्ट उपक्रमाच्या बससेवेचा लाभ घेतलेल्या प्रवाशांची एकूण संख्या 106 कोटी 10 लाख 84 हजार एवढी आहे. बसवाहतुकीमधून रु 1367.11 कोटी उत्पन्न प्राप्त झालेले असून बस प्रवर्तनकरिता एकूण खर्च रु 2272.41 कोटी एवढा झालेला आहे. एकूण घाटा 905.3 कोटी झाला आहे.  प्रति प्रवासी खर्च 21.41 रुपये आणि त्या तुलनेत उत्पन्न फक्त 12.88 रुपये आहे. दररोज 29 लाख 07 हजार 080 प्रवासी बेस्टचा प्रवास करतात.बेस्ट प्रशासनाने वर्ष 2014-15 या दरम्यान विविध करापोटी रु 139.68/- कोटी शासनास भरणा केला तर वर्ष 2015-16 या दरम्यान रु 136.75/- कोटी अदा केले. बेस्ट प्रशासनाने वर्ष 2010 ते 2016 या 7 वर्षाच्या दरम्यान 11 वेळा नगर विकास, परिवहन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांस पथकर, प्रवासी कर, पोषण अधिभार, मोटर वाहन कर व नोंदणी परवाना शुल्क आणि मुल्यवर्धित कर रद्द करण्याची मागणी केली ज्यास शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.वर्ष 2014-15 मध्ये भाडे वाढ टाळण्यासाठी श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेने रु 150 /- कोटीचे अनुदान दिले होते पण त्यानंतर पालिकेने हात झटकले आहे. पालिकेचे अनुदानसोबत विविध करांची माफ़ी मिळाली तर बेस्टला घाटयाच्या सौदातून बाहेर पडण्यास मदतच मिळेल, असे सांगत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित पालिका आयुक्तांस लेखी पत्र पाठवित मागणी केली आहे की सर्वसामान्याची अशी 'बेस्ट' सेवेस अश्या संकट प्रसंगी शासन आणि पालिकेने संयुक्तरित्या मदत करावी. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस बळकटी देण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी उभारत बेस्ट सेवेस आपली मायेची ऊब दयावी, असे भावनिक आवाहन गलगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment