मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शाब्रीन यांच्या पुढाकाराने दादर (प.) येथील टिळक भवनात एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध मान्यवरांनी निवडणूक व्यवस्थापन, पालिका कारभार आणि माहिती अधिकार (RTI) याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका आणि आरटीआयविषयी सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि जनहितासाठी तिचा प्रभावी वापर कसा करायचा” याबाबत त्यांनी टिप्स दिल्या. “बूथ मजबूत करा, मग बाकीचे सर्व होऊ शकते,” असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस एड. संदेश कोंडविलकर यांनी पालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक अटी, प्रक्रिया आणि काळजी कोणती घ्यावी याची माहिती दिली.
माजी नगरसेवक आसिफ झकारिया यांनी मुंबई महानगरपालिकेची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती यावर सविस्तर माहिती दिली. “कोणत्या विभागाचे कोणते काम आहे आणि नागरिकांना सेवा देताना जनप्रतिनिधींनी काय लक्षात ठेवावे” यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात भारतीय युवक काँग्रेस सोशल मीडिया चेअरमन मनु जैन यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रचार, संवाद आणि मतदारांशी संपर्क वाढवण्याबाबत त्यांनी रणनीती सांगितली.
शिबिरात भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस सुरभी द्विवेदी, सचिव प्रभारी पवन मजेठिया, सचिव हरगुन सिंह यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment