पालिकेने 5 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडली
मुंबई महापालिकेने मागील 5 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महापालिकेने दिली आहे. यात बेस्टला अधिदान देण्यासाठी 6 वेळा मुदत ठेव मुदतपूर्व मोडली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागील 5 वर्षात मुंबई महापालिकेकडे मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती मागितली होती. पालिकेच्या उप प्रमुख लेखापाल ( महसूल 2) ने अनिल गलगली यांस 8 मुदत ठेव मुदत पूर्व तोडल्याची यादी दिली. 2360 कोटी 20 लाख 19 हजार रुपये अशी मोडलेल्या मुदत ठेवींची रक्कम आहे.
◆ कर्मचाऱ्यांसाठी मोडली 645.20 कोटींची मुदत ठेव
कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन धारकांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन / निवृत्ती वेतनाचे अधिदान गणेशोत्सव सणापूर्वी दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियातुन 29 ऑगस्ट 2022 रोजी 645,20,07,000 इतकी मुदत ठेव मोडली.
◆ एमएमआरडीएला दिले 949.50 कोटी
एमएमआरडीएला अधिदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात जमा असलेली 949,50,00,000 इतकी मुदत ठेव दिनांक 15 मार्च 2024 रोजी मोडली.
◆ बेस्टला दिले 756.50 कोटी
2019 -20 च्या 19 ऑगस्ट 2019 रोजी 250 कोटी आणि 113 कोटी अश्या 2 मुदत ठेवी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. 21 ऑगस्ट 2019 रोजी 115 कोटींची मुदत ठेव पुन्हा बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडली. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या. 2022-23 च्या 25 मार्च 2022 रोजी बेस्ट अधिदान करण्याकरिता एकाच दिवशी 3 मुदत ठेवी अनुक्रमे 100 कोटी, 92.06 कोटी आणि 87.06 कोटी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या.
No comments:
Post a Comment