एज्युकल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे अविनाश धर्माधिकारी यांच्या संयोजन अंतर्गत विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले गीत वंदे मातरम यावर मैफिल आयोजित करण्यात आली होती. एकाच वेळी सुगम आणि शास्त्रीय अशा दोन्ही संगीतांचा आस्वाद या मैफलीत रसिकांना घेतला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार पराग अळवणी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, अभिनेते सचिन खेडेकर, डॉ सुधीर निरगुडकर, श्रीधर फडके, मनोज नाथानी, अनिल गलगली उपस्थित होते. शब्द मल्हारचे निरुपणकार स्वानंद बेदरकर यांनी सुरुवातीला सांगितले की वंदे मातरम् हे गीत आज सर्वत्र म्हंटले जात असले तरी ते पूर्ण म्हटले जात नाही. त्याचे फक्त पहिलेच कडवे म्हटले जाते.
या मैफलीत संपूर्ण पाच कडव्यांचे वंदे मातरम गायले गेले आणि ते तीन वेगवेगळ्या चालींमध्ये ऐकवले. गायकीबरोबरच वेगवेगळे वाद्य आणि त्यांचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. देस रागाबरोबरच नव्या दोन रागांमध्ये दोन चाली ज्ञानेश्वर कासार यांनी या गीतासाठी रचल्या असून स्वत: ज्ञानेश्वर कासार यांच्याबरोबर आशिष रानडे यांनी गायन केले. तर पं. सुभाष दसककर, अनिल दैठणकर, मोहन उपासनी, अनिल धुमाळ, उमेश खैरनार, ओंकार अपस्तंभ, ओंकार भुसारे यांनी संगीत साथ दिली. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.
स्वानंद बेदरकर यांचे निरुपण खूपच अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी होते आणि रसिकांनी दाद दिली. आनंद मठ पासून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनाचा प्रवास व त्यात अनेकांच्या योगदानाचा उहापोह केला.
No comments:
Post a Comment