Tuesday 27 July 2021

आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे सुद्धा मानधन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार बनल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहे त्याची माहिती देताना नाव, वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी. चिटणीस खात्याने अनिल गलगली यांस कळविले की खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. 25,000/-  मानधनासाठी  आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150/- भत्त्यासाठी अश्या केवळ चार सभांकरिता दिले जाते.

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे त्या ठिकाणी राजीनामे घेणे आवश्यक होते पण दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अश्या परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते.

1 comment:

  1. चांगला मुद्दा आहे. राजकीय पक्षांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. दोन दोन वेतन परत करावेत.

    ReplyDelete