Wednesday, 9 June 2021

12 वर्षात 30 कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या 116 कलव्हर्ट वर खर्च

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन येथे पावसाचे पाणी साठल्याने बंद करण्यात आली असून कलव्हर्ट स्वच्छ न झाल्याचा फटका रेल्वे सेवेला बसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. मागील 12 वर्षात 30 कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या 116 कलव्हर्ट वर खर्च करण्यात आले असून 30 कोटी पाण्यात वाहून गेले असल्याची टीका होत आहे.

मुंबईतील रेल्वे अंतर्गत कलव्हर्ट म्हणजे मोरया या प्रत्येक वर्षी रेल्वे प्रशासन स्वच्छ करते आणि पालिका प्रत्येक वर्षी 3 ते 4 कोटी शुल्क अदा करते.  मागील 12 वर्षात रेल्वेला 30 कोटी प्राप्त झाले आहेत पण आजमितीस कोणत्याही प्रकारचे ऑडिट ना रेल्वेने केले ना पालिकेने केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. आज मुंबई रेल्वे सेवा अंतर्गत 116 कलव्हर्ट असून 53 मध्य रेल्वे, 41 पश्चिम रेल्वे आणि 22 हार्बर रेल्वेत आहेत. वर्ष 2009-2010 ते वर्ष 2017-18 या 9 वर्षात 23 कोटी रुपये मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते. वर्ष 2018-19 मध्ये 5.67 कोटी रुपये दिले होते. एकंदरीत मागील 12 वर्षात 30 कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या 15 दिवसात पूर्ण करण्याचा दावा केला आहे.

अनिल गलगली यांच्या मते दरवर्षी पावसाळयापूर्वी पालिका रेल्वेला पैसे तर मोजते पण या मोरी सफाईचा कोठल्याही प्रकारचे ऑडिट होत नाही. मागील 3 वर्षांपासून रेल्वे सेवा हमखास कुर्ला आणि सायन दरम्यान ठप्प होते. 31 मे पर्यंत मोरी साफ करून सर्वेक्षण केल्यास अशी परिस्थिती उदभवणार नाही. यासे सांगत अनिल गलगली यांनी दोन्ही एजन्सी तितक्याच जबाबदार असल्याचे सांगितले. रेल्वे असो किंवा पालिका, दोन्ही एजन्सीने करण्यात आलेला खर्च, काढलेला गाळ याची इत्यंभूत माहिती जनतेच्या माहितीसाठी ऑनलाईन करणे आवश्यक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment