Thursday 24 August 2017

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा निकालाची आता तिसरी डेडलाईन 

मुंबई विद्यापीठाचे परीक्षेचे निकाल घोषित करण्यास झालेला प्रचंड विलंबावर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मुंबई विद्यापीठाने 31 ऑगस्ट 2017 पर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल घोषित करण्याची माहिती दिली. यामुळे आता मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे निकालाची तिसरी डेडलाईन दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ए व्ही मोहता आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत मुंबई विद्यापीठाने 31 ऑगस्ट 2017 पर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल घोषित करण्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे वकील रुई रोड्रिग्स यांनी दिली. यात विधी, विज्ञान आणि कला शाखेच्या परीक्षेचा समावेश असेल. याचिकाकर्ता सचिन पवार आणि अभिषेक भट यांच्यावतीने जेष्ठ वकील सतिश तळेकर यांनी बाजू मांडली.

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि अनिल गलगली यांनी पत्रकार परिषद घेतली. अंजली दमानिया यांनी सांगितले की संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणे गरजेचे असून यात जे सुद्धा जबाबदार आहेत त्यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया चुकीची आणि सपशेल बोगस होती. अनिल गलगली यांनी सांगितले की माहिती अधिकार अंतर्गत मे 2017 रोजी रखडलेल्या मागील निकालाची माहिती समोर आली होती आणि याबाबतीत राज्यपाल तसेच शिक्षण मंत्र्यांस पत्रव्यवहार करुनही त्यास जितकी आवश्यकता होती तितकी काळजी घेण्यात आली नाही. परीक्षा नियंत्रकाचे पद रिक्त असल्याची तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षापणामुळे आज परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याचा आरोप गलगली यांनी करत यास राजभवनातील शिक्षण विभागास जबाबदार ठरविले आहे. 

याचिकाकर्ते सचिन पवार यांनी यास सर्वस्वी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांस जबाबदार ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पवार यांच्या मते ऑनलाइन तपासणी प्रक्रिया शत प्रतिशत अपयशी ठरली आहे आणि लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याची सरकारने खेळ मांडला आहे. अभिषेक भट यांच्या मते नवीन तारीख दिल्याने मुंबई विद्यापीठाने स्वतःच आपल्या अपयशाची कबुली दिली आहे.

No comments:

Post a Comment