Friday 18 August 2017

सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर पाककृती स्पर्धेसाठी

महाराष्ट्र शासनाच्या सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट शासन परिपत्रक असताना त्याचा गैरवापर राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या पत्नी तनुजा मलिक या अध्यक्ष असलेल्या आईएएस विव्हज असोसिएशनने केला असून पाककृती स्पर्धा चक्क सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित केली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीतून हा गैरवापर समोर आला असून राजशिष्टाचार विभागाने सनदी अधिका-यांच्या बायकांसमोर अक्षरशः लोटांगण घातल्याचे सिद्ध होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या वापराबाबत शासनाने निश्चित केलेले निकष आणि गेल्या 3 वर्षात झालेल्या वापराची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाने अनिल गलगली यांस गेल्या 6 महिन्यात झालेले आरक्षणाची माहिती दिली. 1 मार्च 2017 पासून 17 जुलै 2017 या 6 महिन्यात एकूण 139 वेळा आरक्षण झाले आणि त्यापोटी शासनास रुपये 28,83,197 इतकी रक्कम भाडयाच्या रुपाने प्राप्त झाली. गेल्या 6 महिन्यात आईएएस ऑफिसर्स विव्हज असोसिएशनने 4 वेळा आरक्षण केले असून त्यांस रुपये 6150 इतके भाडे आकारले गेले. 9 मार्च 2017 रोजी मावळत्या अध्यक्षा क्षत्रिय यांसकडून पदभार स्वीकारताना सह्याद्री राज्य अतिथीगृह आरक्षित केले गेले तर 8 जुलै 2017 रोजी पाककृती स्पर्धेसाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर केला गेला. याव्यतिरिक्त 18 एप्रिल आणि 20 मे 2017 रोजी सुद्धा सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर नियमांचे उल्लंघन करत केला गेला. भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी सुद्धा 14 जून 2017 रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर केला होता. सह सचिव लता नंद कुमार यांनी 22 जून 2017 रोजी आरक्षण करताना कार्यक्रमाचा उल्लेख केला नसतानाही उपसचिव भोगे यांनी कक्ष उपलब्ध करुन देण्यासाठी दूरध्वनीवरुन आदेश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. 24 जुलै 2015 च्या शासन परिपत्रकानुसार नियम 4 आ प्रमाणे सह्याद्री राज्य अतिथीगृहात यापुढे फक्त मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव वा त्या दर्जाच्या अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिका-यांच्या बैठका/ कार्यशाळा/पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात, असा आदेश जारी करण्यात आला असतानाही सनदी अधिका-यांच्या बायकांच्या असोसिएशनला नियमांचे उल्लंघन करत सह्याद्री राज्य अतिथीगृह देण्यात आले, असा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. विशेष म्हणजे सह्याद्री राज्य अतिथीगृहात कोणत्याही प्रकारच्या जन सुनावण्या आयोजित करण्यास मज्जाव करणारे शासन खाजगी कार्यक्रमास वापरत अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा दुरुप्रयोग करत आयोजित पाककृती स्पर्धेत अप्पर मुख्य सचिव असलेले संजय कुमार विजयी ठरले आणि त्यांनी 2 तासाच्या आत पराठा बनविण्याचा विक्रम केला. याबाबीची जाहीर माहिती मुख्य सचिव यांच्या पत्नी तनुजा यांनी 'हार्मोनी' या न्युज लेटरच्या जुलै 2017 च्या अंकात दिली आहे. तसेच यावेळी तनुजा मलिक यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला होता.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की याबाबतीत नियम मोडण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या अधिका-यांवर कार्यवाही करत आईएएस विव्हज असोसिएशन आणि आमदार पुरोहित  कडून व्यावसायिक भाडे वसूल करावे आणि भविष्यात कार्यक्रम स्तरावर भाडे निश्चित करावे जेणेकरुन सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापरापायी शासनास अधिक महसूल प्राप्त होईल.

No comments:

Post a Comment