Wednesday 16 March 2016

कल्याण- डोंबिवलीला अजूनही प्राप्त झाला नाही 6500 कोटींचा पॅकेज

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 ऑक्टोबर 2015 रोजी भाजपच्या विकास परिषदेत शहर विकासासाठी 6500 कोटींचे ‘निवडणूक पॅकेज’च जाहीर केले होते. शासनाकडून आजमितीपर्यंत कोणताही निधी मनपास प्राप्त न झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती मागितली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणूकीत कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेस 6500 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती त्यापैकी किती रक्कम आतापर्यंत देण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाने गलगली यांचा अर्ज नगरविकास खात्याकडे पाठविला तर नगरविकास खात्याने एमएमआरडीए प्रशासनाकडे पाठवित आपले हात झटकले. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे लेखाधिकारी तथा माहिती अधिकारी विनय कुलकर्णी यांनी कळविले की शासनाकडून आजमितीपर्यंत कोणताही निधी मनपास प्राप्त झालेला नाही. अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्र्यानी दिलेले आश्वासन पाळत 6500 कोटींचे पॅकेज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस देणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात मुख्यमंत्री या पदाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल आणि जनता विश्वास ठेवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2015 रोजी पालिका निवडणूकीच्या प्रचार दरम्यान कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेस 6500 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. यापूर्वीही वगळलेल्या 27 गावांसाठी 1200 कोटींचे विशेष पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले आहे.त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment