Wednesday, 24 March 2021

हाफकिन संस्था पूर्णकालिक संचालकाच्या प्रतीक्षेत!

नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली असून त्याचा कायापालट करण्याची चर्चा जोरात आहे पण दुर्दैवाने हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेत मंजुर पदे शत प्रतिशत भरण्याची तसदी शासनाने घेतली नाही. एकूण 173 मंजुर पदापैकी 57 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस हाफकिन संस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे हाफकिन संस्था पूर्णकालिक संचालकाच्या प्रतीक्षेत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडे विविध माहिती मागितली होती. त्यात एकूण मंजुर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहितीचा समावेश होता. हाफकिन संस्थेने अनिल गलगली यांस 25 जानेवारी 2021 पर्यंतचा अभिलेख उपलब्ध करुन दिला. यात एकूण 173 मंजुर पदापैकी 57 पदे रिक्त असून 116 पदे भरलेली आढळून येत आहे.

वर्ग अ अंतर्गत एकूण 8 पदनामाची 28 मंजुर पदे असून 21 पदे रिक्त आहेत. यात 1 संचालक, 1 उपसंचालक, 6 सहाय्यक संचालक, 11 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, 1 वैज्ञानिक सचिव,1 मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी संख्या आहे. संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सीमा व्यास यांसकडे आहे. 

वर्ग ब अंतर्गत 23 मंजुर पदापैकी 7 पदे रिक्त आहे ज्यात 7 वैज्ञानिक अधिकारी यांचा समावेश आहे. वर्ग क अंतर्गत 68 पैकी 47 पदे भरलेली असून 21 पदे रिक्त आहेत ज्यात 2 पैकी 2 अधिक्षक पदे रिक्त आहेत. तर 9 वरिष्ठ तंत्र सहाय्यक, 3 वरिष्ठ लिपिक, 5 प्रयोगशाळा सहाय्यक, 1 सर्पपाल, 1 लिपिक अशी रिक्त पदे आहेत. वर्ग ड अंतर्गत 54 पैकी फक्त 8 पदे रिक्त असून यात 5 प्रयोगशाळा परिचर, 1 हवालदार, 1 शिपाई आणि 1 गृह स्वच्छ नि सफाईगार अशी पदे रिक्त आहेत.

अनिल गलगली यांच्या मते हाफकीन इन्स्टिट्यूट ही देशातील सर्वात जुनी बायोमेडिकल संशोधन संस्था असताना वर्ष 2005 रोजी शासनाने 306 मंजुर पदे ही 173 वर आणून ठेवली आणि 133 पदे रद्द केली. मोठ्या प्रमाणात पदे रद्द करुन हाफकिनला पुनरुज्जीवित करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने संपविण्याचा डाव आहे म्हणून रिक्त पदे भरली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तातडीने लक्ष घालत रिक्त पदे शत प्रतिशत भरण्यासाठी संबंधितांना आदेश दयावेत, अशी मागणी अनिल गलगली यांची आहे.

No comments:

Post a Comment