Thursday, 26 March 2026

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चुनाभट्टीत भव्य महिला संमेलन संपन्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चुनाभट्टीत भव्य महिला संमेलन संपन्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विश्वकर्मीय लोहार सेवा संघ, मुंबई यांच्या वतीने मुंबई उपनगरातील चुनाभट्टी येथील साई बाबा मंदिरासमोरील खुल्या व्यासपीठ मैदानात भव्य महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विश्वकर्मा व क्रांतिकारी शिक्षणप्रणेती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.


या कार्यक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, नगरसेविका राणी येरूणकर, शासकीय माहिती अधिकारी वर्षा फडके, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुहास चरकरी, उपाध्यक्ष प्रवीण काताळकर, हिशोबनीस सौ. निधी कोळंबकर, नितीन पानवलकर, माजी अध्यक्ष राजाराम काताळकर, माजी सचिव चंद्रशेखर काताळकर, संजय कोळंबेकर यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य व लोहार समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर देत, महिला आर्थिक धोरणे, लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे शासकीय अनुदान व विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष व सदस्य प्रदीप चांदोरकर यांनीही समाजातील महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या संमेलनाच्या माध्यमातून समाजातील लघुउद्योगात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समिती प्रमुख कविता प्रेम चरकरी, जानवी चरकरी व निधी कोळंबकर यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नितीन पानवलकर यांनी केले, तर कविता प्रेम चरकरी यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाची संकल्पना प्रभावीपणे मांडली. हा भव्य महिला संमेलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरला.

No comments:

Post a Comment