बोगस जात प्रमाणपत्र आणि दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे गेल्या 10 वर्षात 16 नगरसेवकांचे पद मुंबई महानगरपालिकेने रद्द केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महानगरपालिका चिटणीस कार्यालयाने दिली आहे. सर्वाधिक 12 नगरसेवक वर्ष 2007 ते 2012 या कालावधीत बाद झाले आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महानगरपालिका चिटणीस कार्यालयाकडे गेल्या 10 वर्षात बाद नगरसेवकांची माहिती मागितली होती. महानगरपालिका चिटणीस विभागाचे सहायक महानगरपालिका चिटणीस प्रमोद गिरी यांनी अनिल गलगली यांस 30 पाने उपलब्ध करुन दिली ज्यात 14 नगरसेवक बोगस जाती प्रमाणपत्र आणि 2 नगरसेवक दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे बाद करण्यात आल्याची बाब समोर आली. वर्ष 2007 च्या महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले शिरीष चोगले, सुनिल चव्हाण, लालजी यादव, रश्मी पहडुकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष सावंत, अंजुम असलम, सिमिंतीनी नारकर, भारती धोंगडे हे बोगस जाती प्रमाणपत्र तर गुलशन चौहान हे 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. वर्ष 2012 च्या महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी भावना जोबनपुत्र, महंमद इसाक,कोडम अनुपा आर हे बोगस जाती प्रमाणपत्र तर शेख सिराज दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे यांचे नगरसेवक पद रद्द केले गेले आहे.
अनिल गलगली यांच्या मते महानगरपालिका चिटणीस विभागाने इतकी महत्वाची माहिती संकेतस्थळावर आजपर्यंत प्रसिद्ध केली नाही. पालिका निवडणूकीत जात प्रमाणपत्र वैध नसल्यास राजकीय पक्षाने अश्या लोकांस उमेदवारी देण्यापासून टाळले पाहिजे जेणेकरुन वैध आणि अवैध बाबींच्या चक्रव्यूहात होणा-या दिरंगाईत नगरसेवक ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतो तेथील नागरी सुविधा कामात व्यत्यय येणार नाही. जे नगरसेवक विविध कारणामुळे बाद झाले आहे अश्या लोकांस भविष्यात उमेदवारी न देण्याची दक्षता राजकीय पक्षाने घ्यावी, अशी अपेक्षा अनिल गलगली यांची आहे.
No comments:
Post a Comment