राज्यात व्यवसाय कराची अंमलबजावणी विक्रीकर विभागाच्या मार्फत करण्यात येते. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्र राज्यात 14047 कोटींचा प्रोफेशनल टॅक्स जमा झाला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे पण जमा झालेल्या रक्कमेच्या विनियोगाची माहिती शासनाकडे उपलब्ध नाही.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात लागू केलेल्या प्रोफेशनल टॅक्सची माहिती मागितली होती. वित्त विभागाने अनिल गलगली यांस कळविले की राज्यात व्यवसाय कराची अंमलबजावणी विक्रीकर विभागाच्या मार्फत करण्यात येते. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्र राज्यात 14047 कोटींचा प्रोफेशनल टॅक्स जमा झाला आहे. वर्ष 2010-11 यावर्षी रु 1683.16 कोटी, वर्ष 2011-12 यावर्षी रु 1768.01 कोटी, वर्ष 2012-13 यावर्षी रु 1817.22 कोटी, वर्ष 2013-14 यावर्षी रु 2146.68 कोटी, वर्ष 2014-15 यावर्षी रु 2166.34 कोटी, वर्ष 2015-16 यावर्षी रु 2169.13 कोटी आणि वर्ष 2016-17 यावर्षी रु 2295.92 कोटी अशी रक्कम जमा झाली आहे.
प्रोफेशनल टॅक्सची जमा झालेली रक्कम कोणकोणत्या कामासाठी वापरली, याबाबत अनिल गलगली यांनी माहिती विचारली होती. याबाबत गलगली यांस कळविले की प्रोफेशनल टॅक्स हा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा होतो. एकत्रित निधीत जमा झालेली रक्कम विविध कामासाठी वापरली जाते त्यामुळे प्रोफेशनल टॅक्स मधून जमा झालेली रक्कम कोणकोणत्या कामासाठी वापरली गेली, अशी स्वतंत्रपणे माहिती देता येणार नाही. अनिल गलगली यांच्या मते ही निधी रोजगार हमी योजनेसाठी खर्च करणे आवश्यक असताना एकत्रित निधीत जमा करणे गैर आहे. शासनाने याबाबत सर्व माहिती सार्वजनिक करावी.
No comments:
Post a Comment