साकीनाका विभागातील नागरिकांस मार्केट उपलब्ध करुन देण्याच्या उदात्त हेतुने मुंबई महानगरपालिकाने साकीनाका येथील पेनिसुला ग्रैंड मार्केट पेनिसुला हॉटेल मालकाला लीजवर दिले होते पण तेथे भलतेच उद्योग धंदे सुरु असल्यामुळे आता मुंबई महानगरपालिका सदर मार्केट ताब्यात घेत तेथे अधिकृत मार्केट सुरु करणार आहे. याबाबतीत सर्वप्रथम आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या मार्केट विभागास सदर बाब निदर्शनास आणून दिली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागाचे सहायक आयुक्त यांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रोजी पाठविलेल्या पत्रात 15 दिवसांच्या आत मार्केट जागा रिकामी करणे आणि सामान काढून घेण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरुन पालिकेस आत प्रवेश करता येईल. मुंबई महानगरपालिकेने वारंवार जागा पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सहायक आयुक्त यांनी पेनीसुलाचे मालक करुणाकरण शेट्टी यांस पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की पालिकेचे लायसेन्स घेतले नाही आणि अनधिकृत बांधकाम सुद्धा केले आहे. पालिकेने सर्वप्रथम 30 जानेवारी 2015 रोजी नोटीस जारी केली होती. त्यानंतर 5 मे 2017 रोजी नोटीस जारी केली होती. पालिकेच्या अधिका-यांनी दिनांक 20 मार्च 2015, दिनांक 13 एप्रिल 2017, दिनांक 15 जून 2017 आणि दिनांक 10 ऑगस्ट 2017 अशी 4 वेळा जागा पाहणी करत तेथे मार्केट सुरु करण्याची सूचना केली पण त्यास कोणतीही दाद दिली गेली नाही. त्यानंतर सहायक आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त, पश्चिम उपनगर यांस याबाबतीत प्रस्ताव सादर करत सदर मार्केट ताब्यात घेण्यासाठी पेनीसुला ग्रँडची लीज रद्द करण्याची परवानगी मागितली. अतिरिक्त आयुक्तांनी दिनांक 16 सप्टेंबर 2017 परवानगी देताच मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागाचे सहायक आयुक्त यांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रोजी पाठविलेल्या पत्रात 15 दिवसांच्या आत मार्केट जागा रिकामी करणे आणि सामान काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेने केलेल्या जागा पाहणीत अनधिकृत बांधकाम आणि मार्केट ऐवजी भलत्याच ऍक्टिव्हिटीज सुरु असल्याची बाब निदर्शनास आली आणि पालिकेने वारंवार सूचना केल्यानंतरही पेनिसुलाच्या मालकाने ऐकलेच नाही. अनिल गलगली यांनी पालिकेच्या भूमिकेचे स्वागत करत प्रतिपादन केले की आता पालिकेने मार्केट सुरु करत स्थानिक नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात.
No comments:
Post a Comment