Wednesday, 10 May 2017

मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँकेतील ठेवीची रक्कम 574.57 कोटी

मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या 58 महिन्यात 22,633 लोकांना 242 कोटी 52 लाख 87 हजार 640 कोटींची भरीव मदत महाराष्ट्र शासनाने केली असून 3161 अर्ज फेटाळले आहेत. सद्यस्थितीला 8 बँकेत मुख्यमंत्री निधीच्या ठेवीची रक्कम 574.57 कोटी असून 41 कोटी 63 लाख 35 हजार 519 कोटींचे व्याज शासनास प्राप्त होत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. 21 जून 2012 रोजी मंत्रालयातील आगीत मुख्यमंत्री सहायता निधीचा सर्व अभिलेख नष्ट झाल्यामुळे त्यापूर्वीच ऑडिट अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याची बाब स्पष्ट होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडे 1 जानेवारी 2005 पासून विविध माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाने अनिल गलगली यांस कळविले की 21 जून 2012 रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीत निधी कक्षातील सर्व कागदपत्रे नष्ट झाली आहेत. त्यामुळे 22 जून 2012 ते 30 एप्रिल 2017 पर्यंतची माहिती दिली. या दरम्यान 21,943 वैद्यकीय मदत केली गेली असून एकूण रक्कम 183 कोटी 15 लाख 930 रुपये आहे तर अपघाती मृत्यु, जळीतग्रस्त, कुत्रिम अवयव रोपणाकरिता 690 लोकांस एकूण 59 कोटी 37 लाख 86 हजार 710 रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदतीसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता प्रचलित कार्यपद्धतीनुसार देय असलेल्या आजारांकरिता पात्र असल्यास रुग्णांची निकड विचारात घेऊन अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त अन्य प्रकरणी अर्थसहाय्याची विनंती प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीच्या ध्येय उद्दिष्टानुसार अर्थसहाय्य अनुज्ञेय असेल आणि मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अर्थसहाय्याचा विचार करण्यात येतो अन्यथा अर्ज प्रलंबित ठेवण्यात येते. वर्ष 2015 पासून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वैद्यकीय कारणास्तव प्राप्त होणा-या अर्जापैकी एकूण 3161 अर्ज फेटाळले आहेत.

 

दिनांक 21 जून 2012 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा सर्व अभिलेख जळून नष्ट झाला आहे. या कालावधीचे ऑडिट पूर्ण  झाल्यानंतर दिनांक 21 जून 2012 रोजीचा जमा रक्कमेचा तपशील उपलब्ध करुन देणे शक्य असल्याचे गलगली यांस कळविले आहे. 2 मे 2017 पर्यंत 8 बँकेत इतकी रक्कम जमा असून त्यामोबदल्यात शासनास इतकी रक्कम व्याजारुपाने प्राप्त होते. स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता अन्य 7 बँका खाजगी आहेत ज्यात 574 कोटी 56 लाख 55 हजार 753 रुपयांच्या ठेवी आहेत. 

No comments:

Post a Comment