Thursday, 17 May 2018

मोनो रेल्वेच्या खर्चात 236 कोटींची वाढ

देशात प्रथमच शुभारंभ करण्यात आलेली मोनो रेल्वेचा टप्पा 1 आणि टप्पा 2 यासाठी अपेक्षित खर्च रु 2,460 कोटी असून आता या खर्चात रु 236 कोटींची वाढ झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आधीच विलंबाने मोनोरेल प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडा सिद्ध झाला असून आता यात वाढीव रक्कमेची भर पडली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 31 जानेवारी 2018 रोजी एमएमआरडीए प्रशासनाकडे मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी अपेक्षित असलेला खर्च आणि वाढीव खर्चाची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाचे जन माहिती अधिकारी तरुवर बॅनर्जी यांनी अनिल गलगली यांस कळविले की मोनोरेल टप्पा 1 आणि मोनोरेल टप्पा 2 यासाठी अपेक्षित एकूण खर्च रु 2,460 कोटी (कर वगळता) आहे. सद्यस्थितीतील एकूण खर्च रु 2,136 करण्यात आला आहे. मोनोरेल टप्पा 1 आणि मोनोरेल टप्पा 2 यासाठी एकूण अपेक्षित वाढीव खर्च रु 236 कोटी इतका आहे. चेंबूर ते वडाळा डेपो या पहिल्या टप्प्यातील असलेले 7 मोनोरेल स्टेशन असून पहिल्या टप्प्याची एकूण लांबी 8.80 किलोमीटर आहे यात चेंबूर, व्ही एन पुरव मार्ग आणि आर सी मार्ग जंक्शन, फर्टलाईजर टाऊनशीप, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा डेपो ही स्टेशन आहेत. संत गाडगे महाराज चौक ते वडाळा डेपो या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परेल, मिंट कॉलनी, आंबडेकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, अंटाप हिल आणि जीटीबी नगर अशी 10 मोनोरेल स्टेशन आहेत. या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची एकूण लांबी 11.20 किलोमीटर इतकी आहे.

मोनोरेल टप्पा 1 आणि मोनोरेल टप्पा 2 या प्रकल्पाच्या वाढीव रु 236 कोटींच्या खर्चास एमएमआरडीए प्राधिकरण समिती, कार्यकारी समिती आणि महानगर आयुक्त यांची मान्यता आहे तसेच शासनाची मान्यता मिळाली आहे, असे अनिल गलगली यांस कळविण्यात आले आहे. अनिल गलगली यांच्या मते मोनोरेल प्रकल्प चुकीच्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आला ज्यामुळे एमएमआरडीए प्रशासनाला तोटाच तोटा सहन करावा लागला आहे. यात गुंतलेल्या सर्वांची चौकशी करत कार्यवाही करणे आवश्यक असून वाढीव खर्च दोषी असलेल्या व्यक्तींकडून वसूल केला पाहिजे.

No comments:

Post a Comment