Friday, 14 April 2017

बेस्टची गुंतवणूक आणि ठेवीची रक्कम फक्त 57 कोटी

तब्बल एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटय़ात असलेला परिवहन विभाग, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही कर्ज काढण्याची परिस्थिती, 44 हजार कर्मचाऱ्यांच्या हाती न पडलेले वेतन यामुळे बेस्ट उपक्रमाचे धिंडवडे निघत आहे. बेस्टकडे गुंतवणूक आणि ठेवीची रक्कम 56 कोटी 98 लाख 56 हजार 740 रुपये असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे बेस्टकडे असलेल्या विविध ठेवी आणि केलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती विचारली होती. बेस्ट प्रशासनाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी( कोष) यांनी अनिल गलगली यांस वळविले की बेस्टकडे गुंतवणूक आणि ठेवीची रक्कम एकूण 56 कोटी 98 लाख 56 हजार 740 रुपये आहे. यात सर्वाधिक गुंतवणूक वीज पुरवठा आकस्मिक राखीव निधी ( ECRF= Electric Supply Contingency Reserve Fund) आणि वीज निधी पिढीवर ( GEF= Generation of Electricity Fund ) असून ती 44 कोटी 19 लाख 28 हजार 740 रुपये इतकी आहे. आंध्र प्रदेश पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, तमिळनाडू पॉवर फायनान्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यूपी कॉर्पोरेशन स्पिनिंग मिल्स तसेच राजस्थान, हरियाणा राज्यातील बॉण्डवर गुंतवणूक केली आहे. दि बेस्ट स्टाफ बेनिफिट फंडसाठी पेडर रोड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील शाखेत एका वर्षांसाठी 7 टक्के व्याजाने 11 कोटी 25 लाखाची ठेवी आहे. दि बेस्ट स्टाफ फॅमिली वेलफेअर फंडसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियात एका वर्षांसाठी 7.40 टक्के व्याजाने 1 कोटी 15 लाखाची ठेवी आहे. बेस्ट एम्प्लॉयज वेलफेअर फंडसाठी कॅनरा बँकेत एका वर्षांसाठी 7.55 टक्के व्याजाने 39 लाख 28 हजार ठेवी आहे.

 

बेस्टच्या तिजोरीत किती रक्कम रोख आहे याबाबत अनिल गलगली यांस कळविण्यात आले की कोष विभागात दैनंदिन रोख व्यवहारासाठी लागणा-या रोख रकमे व्यतिरिक्त बेस्ट तिजोरीच्या अंतर्गत रोख रक्कम उपलब्ध नाही. बेस्ट उपक्रमाचे कॅनरा बँक खाते वजा शिल्लक आणि ओव्हरड्राफ्ट दर्शविते. अनिल गलगली यांच्या मते बेस्ट प्रशासनाने नफ्यात असताना गुंतवणूक आणि ठेवीच्या रक्कमेकडे लक्ष दिले असते तर आज परिस्थिती बिकट झाली नसती.

No comments:

Post a Comment