Tuesday, 1 November 2016

पालिकेच्या भाडेकरुची संपूर्ण माहिती 3 महिन्यात संकेतस्थळावर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्यांतर्गत भाडेकरुंची संख्या 46,563 असून पुढील 3 महिन्यात संपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मालमत्ता विभागाने दिली आहे. यात मनपाच्या मक्त्याने दिलेल्या भूखंडाबाबत मक्त्याच्या कालावधी, मक्त्या भूभाडे, मक्तेदाराची माहिती, अतिरिक्त भुईभाडे, मक्त्याच्या अटीशर्ती इतर माहिती असणार आहे. यापूर्वी फक्त भाडेकरुंचे नाव आणि भाड्याची रक्कम प्रदर्शित केली जात आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मालमत्ता विभागाकडे भाडेकरुंची संख्या व वसूल होणा-या भाड्याची रक्कम याची माहिती विचारली होती. मालमत्ता विभागाच्या प्रशासकीय अधिकारी( लेखा) व जन माहिती अधिकारी अ. भा.कदम यांनी अनिल गलगली यांस कळविले की एकूण भाडेकरुंची संख्या 46,563 इतकी असून भाड्याची एकूण रक्कम रु. 18,26,32,000/- इतकी असून त्यापैकी वसूल झालेल्या भाड्याची रक्कम रु.11,22,12,677/- इतकी आहे. सदर आकडेवारी सॅप प्रणाली अंर्तगत आर्थिक वर्ष 2015-2016 या कालावधीची आहे. तसेच वर्ष 2014 पासून भाडेकरुंचे नाव आणि भाड्याची रक्कम प्रदर्शित केली जात आहे. परंतु भाडे वसुली आणि थकबाकी सद्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. भाडेकरुंच्या भाडेतत्वावरील करारपत्रांची माहिती सद्यस्थितीत विभाग पातळीवर कार्यरत कर्मचा-यांना उपलब्ध असून सदर माहिती सर्वसाधारण नागरिकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणातून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या मक्त्याने दिलेल्या भूखंडाबाबत मक्त्याच्या कालावधी, मक्त्या भूभाडे, मक्तेदाराची माहिती, अतिरिक्त भुईभाडे, मक्त्याच्या अटीशर्ती इतर माहिती पुढील 3 महिन्यात उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

अनिल गलगली यांनी याबाबत समाधान व्यक्त करत पालिकेच्या प्रत्येक विभागाने मालमत्ता विभागाचे अनुसरण करण्याची गरज असल्याचे सांगितले. यामुळे सामान्य नागरिकांना वेळेवर माहिती मिळेल.


No comments:

Post a Comment