Saturday, 16 July 2016
मुंबई क्रिकेट एसोसिएशनने क्रिकेट वर्ल्ड कप पोलीस बंदोबस्ताचे 3.60 कोटी थकविले
मुंबई पोलीस दलातील हजारों पोलीस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जात असून त्या बंदोबस्ताचे शुल्क अदा करण्यात मुंबई क्रिकेट एसोसिएशन चालढकल करत आहे. मागील 6 क्रिकेट स्पर्धेकरिता पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे रु 3.60 कोटी आजपर्यंत अदा केले नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलीसांनी दिली आहे. एनसीपी नेते शरद पवार आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्या पैनलची निर्विवाद सत्ता मुंबई क्रिकेट एसोसिएशन यात असल्यामुळेच मुंबई पोलीस सावधगिरी बाळगत आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीसांकडे 1 जानेवारी 2011 पासून संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी दिला गेलेला पोलीस बंदोबस्त आणि शुल्काची माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (समन्वय) रमेश घडवले यांनी बंदोबस्त शाखेने दिलेली माहिती उपलब्ध करत कळविले की आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वकप 2016 अंतर्गत प्रत्येकी रु 60 लाख प्रमाणे 6 सामन्याचे रु 3.60 कोटी शुल्क प्रलंबित आहे. दिनांक 10 मार्च रोजी न्यूझिलंड विरुद्ध श्रीलंका, 12 मार्च रोजी न्यूझिलंड विरुद्ध इंग्लंड आणि इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दिनांक 16 मार्च रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड, दिनांक 18 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, दिनांक 20 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज आणि दिनांक 31 मार्च 2016 रोजी इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज असे 6 सामने झाले होते.
आरटीआय नंतर वसूली कार्यवाही सुरु
मुंबई पोलीसांनी 3756 इतका प्रचंड पोलीस बंदोबस्त दिला पण त्यासाठी आकारलेले शुल्क वसूल केलेच नाही. अनिल गलगली यांच्या आरटीआय अर्जानंतर दिनांक 24 जून 2016 रोजी पोलीस उपायुक्त अशोक दुधे (अभियान) यांनी सशस्त्र पोलीस दलाचे पोलीस उप आयुक्त यांस लेखी पत्र पाठवून पोलीस बंदोबस्ताची रु 3.60 कोटीची रक्कम वसूल करण्याची सूचना केली. पण अद्यापपर्यंत मुंबई क्रिकेट एसोसिएशनने कोणतीही दाद दिली नाही.
व्याज आकारले नाही
गेल्या 4 महिन्यापासून थकबाकी असलेली कोटयावधीची रक्कम वसूल करण्यासाठी जी कार्यवाही सुरु आहे त्या रक्कमेवर मुंबई पोलीसांनी कोणतेही व्याज आकारले नाही. रु 3.60 कोटीची थकबाकी रक्कमेवर व्याज न आकारण्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी 2011 मध्ये झालेल्या 4 सामन्यांचे बंदोबस्त शुल्क रु 2 कोटी 65 लाख 49 हजार 885 अदा करण्यात आली आहे.
अनिल गलगली यांच्या मते पोलीस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणा-या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब अदा करणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल केले नसून पोलीस आयुक्तांनी जबाबदार अधिकारीवर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करत अश्या सामन्यांचे शुल्क सामना संपताच वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आधीच शुल्क वसूल करावे. जेणेकरुन पोलीसांस बंदोबस्ताचे शुल्क वसूलीचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment